मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यातील शाब्दीक युद्ध थांबलेले नाही. दोघांच्याही सतत सभा सुरू आहेत. शरद पवारांनी राज्यव्यापी दौरा जाहीर केला आहे. तर त्याला प्रत्युतर देण्यासाठी अजित पवार जंग पछाडून काढताहेत. अशात आता बीड येथील गाजलेल्या शरद पवारांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार सभा घेणार असल्याची माहिती आहे.
शरद पवार यांनी १७ ऑगस्ट रोजी सभा घेतली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता येत्या २७ ऑगस्ट रोजी अजित पवारांची सभा होणार असल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा आणि महावितरणकडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.
यावेळी मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या सर्वांनीच बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांसह अन्य प्रस्तावित आणि तातडीची कामं तसेच दुष्काळी परिस्थिती संदर्भात माहिती दिली. यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचे अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे बीडच्या सभेतून अजित पवारांकडून शरद पवारांना विकास कामांची घोषणा करून उत्तर दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
उत्तर सभेचे ठरले प्लॅनिंग
बीडच्या सभेत कसे उत्तर द्यायचे याबाबत आज अजित पवारांनी मुंबईत बीडच्या लोकप्रतिनिधी आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, यावेळी बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे ठरले आहे.
Politics NCP Ajit Pawar Beed Sabha Strategy
Sharad Pawar Answer Dhananjay Munde