धाराशिव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार, असे भाकित करणारे वृत्त काही दिवसांपूर्वी झळकले होते. त्यानंतर एका ठिकाणी अजितदादांच्या फोटोसोबत ‘जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर्स झळकले होते. आणि आता तर थेट अजितदादांच्या सासूरवाडीतच अश्यापद्धतीचे बॅनर लागले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार भाजपसोबत्त सत्तेत जाणार असल्याचे बोलले जात आहे. न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात जाणार आणि शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार. सत्ता वाचविण्यासाठी भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊन अजितदादांना मुख्यमंत्री करणार, अश्यापद्धतीची राजकीय चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. या चर्चेतील तथ्य आणि अफवा स्वतः अजित पवार यांनाच माहिती. पण त्यांच्या पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील भावना दाबून ठेवल्या नाहीत.
धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यात तेर गाव अजितदादांचे सासर आहे. या तेरमध्येच अजितदादा भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर झळकले आहेत. ‘तेरचे जावई, आमचे ने… जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार’ असा मजकूर असलेले बॅनर्स गावातील प्रत्येक चौकात लागले आहे. जावई मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सासरवाडीने संत गोरोबा काकांना साकडे घातले आहेत. मंगळवारी सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पुजा करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी अजित पवार भाजपात जाणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. महाराष्ट्रातील राजकारणात ते भूकंप घडवून आणतील, असेही बोलले जात होते. पण ‘मी जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण लगेच दुसऱ्या दिवशी एका मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शवली. त्यानंतर पुण्यातील थेट कोथरुड परिसरात म्हणजेच भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘जनतेच्या मनातला मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे बॅनर्स लागले आणि आता पुन्हा त्यांच्या सासरवाडीत अशाच आशयाचे बॅनर्स लागले आहेत.
पुण्यात राष्ट्रवादी सक्रिय
पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झाले आहेत. ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार’ असा मजकूर असलेले एक बॅनर पुण्यात लागले होते. या बॅनर्सवर अजित पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले होते.
Politics NCP Ajit Pawar Banners Temple Puja