नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदासाठी दोन महिलांमध्ये बैठकीत शाब्दीक चकमक झाल्यानंतर या महिलांमध्ये पोलिस स्थानकात बाचाबाची झाली. विशेष म्हणजे पालकमंत्री दादा भुसे, महाराष्ट्र राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत पदे वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना हा वाद झाला. या वादानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात सायंकाळी दोन्ही माहिलांनी एकमेकांविरुध्द तक्रारी केल्या आहे.
शनिवारी विश्रामगृहावर ही बैठक बोलविण्यात आली होती. महिला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मी काठे आणि शोभा मगर या दोन्ही या पदासाठी दावेदार होत्या. त्यामुळे हा वाद पेटला. शिदें गट सत्तेत येऊन वर्ष पूर्ण होण्याची वेळ आली असतानाही अद्याप जिल्हा कार्यकारिणी निवडीचे काम झालेले नसल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी ही बैठक होती. यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. मात्र दोन महिलांच्या भांडणात त्यांनाही हात टेकावे लागले.
अखेर पक्षातून हकालपट्टी
पक्षाच्या बैठकीत झालेला हा प्रकार पाहून अखेर शिंदे गटाच्या शिवसेनेने दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. दोन्ही महिलांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे आदेश शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी काढले आहेत. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, ही कारवाई करण्यात आली आहे.
Politics Nashik Shiinde Group Womens