नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेवरील सत्ता कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता आक्रमक धोरण स्विकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका निवडणुकीची धुरा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. महाजन हे खान्देशचे आहेत. तसेच, नाशिक शहरात खान्देशी मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच, निवडणुकीच्या तोंडावर होणारे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठीही ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
नाशिक भाजपची धुरा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली. मात्र, ते फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षातील नगरसेवक आणि नेते हे शिवसेनेसह अन्य पक्षात जाण्याची कुजबूज सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षात असलेली सत्ता आता परत जाऊ नये यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळेच भाजपने संकटमोचकाचे अस्त्र बाहेर काढले आहे. गिरीश महाजन यांच्याकडे राजकारणाचा चांगला अनुभव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. त्यानंतर गत विधानसभा निवडणुकही महाजन यांच्या नेतृत्वातच नाशिकमध्ये लढविली गेली. नाशिक शहरात भाजपचे तिन्ही आमदार पुन्हा निवडून आणण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पक्षाने महापालिकेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे.
https://twitter.com/girishdmahajan/status/1500071179889307654?s=20&t=dY7YliieSjwDBJ4fBZzh7w
नाशिक मनपाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर महाजन हे आज प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले. त्यामुळे नाशिक भाजपच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर भाजप कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जोरदार टीका केली. परिणामी, नाशिकमध्ये भाजपचे हेच दोन मुख्य विरोधक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, गेल्या पाच वर्षातील महापालिकेतील विविध विकासकामांजा गजर आगामी काळात आक्रमकपणे करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये होऊ घातलेली निओ मेट्रो आणि आयटी प्रकल्प यांचे मोठे भांडवल या निवडणुकीत केले जाणार आहे. त्यादृष्टीने रणनीती आखली जाणार आहे.
भाजपला सोडचिठ्ठी देण्यामध्ये कुठल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, याची एक यादीच महाजन यांनी केल्याचे समजते. या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची महाजन यांच्याकडून स्वतंत्ररित्या भेट घेतली जाणार आहे. तसेच, ते नाराज का आहेत, अन्य पक्षात जाण्याची कारणे काय आहेत, हे जाणून घेणार आहेत. तसेच, या सर्वांनी अन्य पक्षात जाऊ नये यासाठी महाजन हे व्युहरचना आखणार आहेत. नाराजांना काही पदे देण्यासह काहींना संघटनात्मक जबाबदारी देण्याविषयी ते चाचपणी करणार आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येते, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. तूर्त तरी संकटमोचकाच्या भरवश्यावर भाजपने महापालिका सोडली असल्याचे निदर्शनास येत आहे.