गौतम संचेती
राज्यात झालेल्या राजकीय भूंकपानंतर स्थानिक राजकारणाचे गणितही बिघडणार आहे. त्यामुळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार हे सारेच संभ्रमात आहेत. अनेकांमध्ये तर प्रचंड अस्वस्थता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व डावपेच खेळणाऱ्या भाजपकडून नाशिकमध्ये कुठला उमेदवार उतरवला जाईल की कुणाला पाठिंबा दिला जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केले. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी यापूर्वीच तयारी सुरू केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत मंत्री झाले आहेत. त्यामुळे नाशिकच्या खासदारकीचे तिकीट कुणाला मिळणार याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवार कुणाचा असेल. भाजप, शिंदे गट की राष्ट्रवादी काँग्रेस या प्रश्नाने सारेच पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. खासकरुन विद्यमान खासदार गोडसे यांच्या पोटात गोळा आला आहे. कारण, गेल्यावेळी त्यांनीच राष्ट्रवादीचे उमेदवार भुजबळ यांचा पराभव केला होता. यंदा नक्की काय होणार दोघांपैकी एक की तिसराच उमेदवार ठरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने या जागेवर आपला उमेदवार असावा यासाठी रणनिती आखून उमेदवारीची चाचपणी सुध्दा केली. दिवंगत माजी खासदार वसंत पवार यांच्या कन्या अमृता पवार यांचा नुकताच झालेला भाजप प्रवेश हा त्याचाच एक भाग होता. त्यामुळे त्या भाजपकडून इच्छुक आहेत. पण, आता भुजबळांच्या भाजप बरोबरच्या युतीमुळे या मतदार संघात तीन उमेदवार झाले आहेत. गोडसे, भुजबळ की पवार. यापैकी कुणाला तिकीट मिळणार की या तिघांव्यतिरीक्त चौथाच उमेदवार समोर येणार, अशी चर्चा रंगली आहे.
विधानसभा मतदारसंघातही पेच
नाशिक लोकसभेप्रमाणेच जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा व इतर सर्व विधानसभा मतदार संघात असा संभ्रम असणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीतही हा पेच होता. तो आता नव्याने झालेल्या महायुतीत आहे. ट्रीपल इंजिनचे हे सरकार वरवर राज्यात मजबुत वाटत असले तरी स्थानिक पातळीवर त्याचे काय पडसाद उमटतात हे येत्या काही दिवसात समोर येईल. त्यानंतर त्याचे फायदे तोटे व राजकीय समीकरणही समजेल.
नाशिक जिल्ह्यात शरद पवारांना मानणारा मोठा गट असला तरी राष्ट्रवादीचे सहाही आमदार हे अजित पवार यांच्या सोबतच राहतील असे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या शपथविधीवेळी दिंडोरीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे उपस्थित होते. तर, कळवणचे आमदार नितीन पवार यांनी स्पष्ट केले आहे की, ते अजित पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादीचे अन्य आमदार दिलीप बनकर (निफाड) आणि माणिकराव कोकाटे (सिन्नर) यांनी अद्याप पत्ते खोललेले नाहीत. त्यामुळे शरद पवार आता नाशिक जिल्ह्यात पुन्हा आपली ताकद कशी उभी करतात व त्यांना कोण साथ देतील हे अद्याप स्पष्ट नाही. एकुणच तूर्त तरी राजकीय संभ्रम कायम आहे. त्यात नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे.