मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खुर्ची ही कायम राजकारणात केंद्रस्थानी असते. आणि या खुर्चीभवती फिरणारे राजकारण सर्वसामान्य जनतेसाठी कायम चर्चेचा विषय असते. गेल्या छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेनंतर एका खुर्चीची चर्चा रंगली होती, पण अजित पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत विषय संपवला.
महाविकास आघाडीने रविवारी (२ एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन केले होते. यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह काही मित्र पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते व्यासपीठावर होते. सर्वांना बसण्यासाठी सारख्या खुर्च्या देण्यात आल्या होत्या. मात्र यात उद्धव ठाकरे यांचीच खुर्ची वेगळी होती. सभेतील गर्दीपेक्षा त्या वेगळ्या खुर्चीचीच राजकीय चर्चा जास्त रंगायला लागली.
दरम्यान, उलटसुलट चर्चा होऊ लागल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊनच त्यावर स्पष्टीकरण दिले आणि उद्धव ठाकरे यांची खुर्ची का वेगळी असणार, याचा खुलासा केला. ‘उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवरून काही लोक उलटसुलट चर्चा करीत आहेत. मला खरं तर गंमतच वाटली. शहानिशा न करता लोक चर्चा करतात. उद्धव ठाकरे यांच्या पाठिचे काही दिवसांपूर्वी एक ऑपरेशन झाले. तेव्हापासून त्यांना पाठिमागे ताठ खुर्ची लागत असते. तेवढीच सोय करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची खुर्ची वेगळी दिसत होती,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बसण्यावरून मतभेद नाहीत
व्यासपीठावर बसण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत, असे लोक बोलू लागले. पण तसे काहीच नाही. आम्ही एकत्र आहोत. आमच्यात मुळीच मतभेद नाहीत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
नाराजीची चर्चा निरर्थक
प्रत्येक सभेत सर्व पक्षांचे दोन-दोन नेते बोलतील, असे आमचे ठरलेले आहे. सर्वच नेते बोलतील असे नाही. त्यामुळे कुणीही नाराज नाही. आमच्यात नाराजी असल्याच्या चर्चा पूर्णपणे निरर्थक आहेत, असेही अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
Politics MVA Uddhav Thackeray Special Chair