नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा आज नागपुरात होणार आहे. या सभेच्या स्थळावरून आधीपासूनच गोंधळ सुरू होता. त्यानंतर विविध कारणाने ही सभा चर्चेत राहिली आहे. १६ एप्रिलला ज्या ठिकाणी ही सभा घेण्याचे मविआने ठरविले आहे, त्या ठिकाणावरून पूर्वी फक्त स्थानिकांच्या विरोधाचीच अडचण होती. मात्र आता १२ हजार क्षमता असलेल्या मैदानावर लाखाची गर्दी कशी येणार, या प्रश्नाने स्वतः महाविकास आघाडीच टेन्शनमध्ये आहे. तसेच, या सभेला कोणते नेते येणार, कोण गैरहजर राहणार यावरुन सध्या चर्चांचा बाजार गरम आहे.
पूर्व नागपुरात दर्शन कॉलनी येथील सद्भावना नगर मैदानावर ही सभा होत आहे. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने परवानगी दिली असून आवश्यक शुल्कही भरण्यात आले आहे. मात्र स्थानिकांनी मैदानाचे नुकसान होण्याच्या कारणाने सभेला विरोध दर्शवला. हा विरोध दर्शविण्यासाठी स्थानिकांनी मैदानावर आंदोलनही केले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मैदानावर क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
मैदानाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. आता याठिकाणी सभा घेतली तर खेळाडूंचे व मैदानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभा रद्द करावी अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा कृष्णा खोपडे यांनी दिला. हा विरोध झुगारून महाविकास आघाडीने सभेच्या प्रचारासाठी रथ फिरवायला सुरुवात केली आहे. मात्र आता एक नवीनच प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. आणि तो आहे गर्दीचा.
वज्रमूठ सभेला एक लाख लोकांची गर्दी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपेक्षित आहे. पण या मैदानावरील स्टेजचा आणि सुरक्षा सर्कलचा भाग सोडला तर मोजून १२ हजार खुर्च्या मैदानावर मावतात. यात आणखी कशीबशी भर घातली तर १५ हजार होतील. मुळात लाखाच्या गर्दीच्या अपेक्षेने होणारी सभा अवघ्या बारा-पंधरा हजार लोकांवर कशी आटोपती घ्यायची, असा प्रश्न आता मविआच्या नेत्यांपुढे आहे.
फडणवीसांच्या गावात सभा
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या टार्गेटवर केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार असले तरीही दुसरी सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावात होत आहे. त्यामुळे नेत्यांच्या टारगेटवर फडणवीस असतील, यात वाद नाही. अशावेळी सभा यशस्वी करून दाखविण्यासाठी लाखोंची गर्दी जमवण्याचे आव्हान नेत्यांपुढे होते. पण आता मैदानाची क्षमता बघता फार तर पंधरा हजारांमध्ये समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
#वज्रमूठ
महाविकास आघाडीची
विराट जाहीर सभा
स्थळ : दर्शन कॉलनी मैदान, KDK कॉलेज समोर, नंदनवन, नागपूर रविवार, 16 एप्रिल 2023 | सायं. 5 वा. pic.twitter.com/GekHF9MKYa— Nilesh Deshbhratar (@Nil_deshbhratar) April 11, 2023
Politics MVA Nagpur Vajramuth Sabha Today