मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. अनिल परब, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्यावर एकापेक्षा एक मोठे आरोप करणाऱ्या सोमय्यांनी आता आपला मोर्चा रवींद्र वायकरांकडे वळविला आहे. वायकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण सोमय्यांनी बाहेर काढले आहे. त्या अंतर्गत वायकरांचे जोगेश्वरी व्यारवली गावातील हॉटेल पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
रवींद्र वायकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. ठाकरे यांच्या खास माणसांमध्ये वायकर यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्या कृपेनेच २०२१ मध्ये वायकर यांना जोगेश्वरीच्या व्यारवली गावात २ लाख स्के. फु. चे ५ स्टार हॉटेल बांधकाम करण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली होती. ही जागा खेळाचे मैदान म्हणून आरक्षित होती. या ठिकाणी वायकर यांनी ५०० कोटींच्या किंमतीचे हॉटेल उभारले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला. वायकर यांनी या जागेवर १ फेब्रुवारी २००४ रोजी खेळाच्या मैदानाचा १५१६, काही भाग स्पॉट्स एज्युकेशन सेंटर म्हणून विकसित करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यासमोरच्या जमिनीवर कायमचे मैदान आरक्षित ठेवण्यात येणार होते. रिक्रिएशन ग्राऊंड म्हणून त्याचा वापर केला जाईल, असे वचन वायकरांनी पालिकेला दिले होते.
याबाबत महापालिका, वायकर आणि महल पिक्चर्स प्रा. लि. या अविनाश भोसले व शहीद बालवा यांच्या मालकीची कंपनीसोबत करारही झाला होता. या भागावर भविष्यात कधीही रवींद्र वायकर त्यांची कंपनी हक्क सांगणार नाही, बांधकाम, डेव्हलपमेंट राईट मागणार नाही, अशा प्रकारचा करार करण्यात आला होता. म्हणजेच उर्वरित मैदान हे महानगरपालिकेचे मैदान झाले होते. २०२१ मध्ये रवींद्र वायकर यांनी ही गोष्ट लपवली, मुंबई महापालिकेची फसवणूक केली आहे, असे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे.
वायकरांना नोटीस
वायकर यांच्याशी संबंधित या प्रकरणाची पोलखोल करण्यासाठी मागील २ वर्षांपासून प्रयत्नरत असून मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र सरकार यांच्याशी आम्ही पाठपुरावा करित होतो. सप्टेंबर २०२२ नंतर या विषयावर चौकशी सुरू झाली. तसेच मुंबई महानगरपालिकेने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी या प्रकरणी रवींद्र वायकर यांना नोटीस दिली, अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे.