मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नव्या सत्तासमीकरणामुळे तीनही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीये. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यामुळे मुंबईतील विकासकामे रखडल्याचा आरोप थेट भाजप आमदारांनी केला आहे. मुख्य म्हणजे शिंदे यांच्या सहीमुळे ही सर्व कामे खितपत पडल्याने महायुतीत नवीन कलगीतुरा रंगल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे आणि नगरविकास खात्याचे जुने नाते आहे. सरकार आघाडीचे असो की युतीचे एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते कायम राहिले आहे. आताही मुख्यमंत्री असताना त्यांनी नगरविकास खाते सोडलेले नाही. अशातच आता भाजपच्या आमदारांनी त्यांच्या विभागाने काही विकायकार्ये रोखून ठेवल्याचा आरोप लावला आहे. मुंबईचा विकास आराखडा आणि अन्य काही प्रश्न हे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर स्वाक्षरी होत नसल्याने रखडल्याचा आरोप करीत भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाला विधानसभेत लक्ष्य केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेने शहर विकास आराखडा तयार करुन तो शासनाला पाठविण्यासाठी कालमर्यादा घातली जाते. पण, त्या आराखडय़ाला अंतिम मंजुरी देण्यासाठी नगर विकास विभागाला कालमर्यादा का नाही, असा सवाल करीत भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी वांद्रे रेक्लमेशन परिसराचा विकास मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील एका सहीसाठी रखडला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. मुंबई विमानतळ परिसराच्या विकास आराखडय़ाला गेल्या १० वर्षांत मान्यता न मिळाल्याने येथील झोपडपट्टय़ांचा विकास मार्गी लागलेला नाही, अशी तक्रार आमदार अॅड. पराग अळवणी यांनी केली. विकास आराखडा रखडल्याने जुन्या इमारतींना धोकादायक ठरवून महापालिका नोटिसा देते, पण, पुनर्विकास होऊ शकत नाही, अशी कैफियत आमदार योगेश सागर यांनी मांडली.
लवकरच बैठक बोलाविणार
तक्रार करणाऱ्या संबंधित भाजप आमदारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे लवकरच बैठक बोलावली जाईल आणि विकास आराखड्याला तातडीने मंजुरी देण्यासाठी पावले उचलली जातील, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारतर्फे सभागृहात दिले आहे.