विशेष प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेस पक्षात राजस्थान, पंजाब आणि केरळ आदी राज्यांमध्ये अंतर्गत कुरबुरी आणि वाद सुरू असताना आता मुंबई प्रदेश काँग्रेसमधील परस्पर मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. पक्षाचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी सोनिया गांधी यांना मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख भाई जगताप यांच्या विरोधात पत्र लिहिले आहे.
झिशान सिद्दीकी म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाची ही अंतर्गत बाब असून याबद्दल मी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. भाई जगताप हे ज्येष्ठ नेते असतील तर त्यांनी माध्यमात येऊन पक्षाची अंतर्गत बाब असल्याने अशी उघड विधाने करू नये. तर यासंदर्भात भाई जगताप म्हणाले होते की, झिशान फक्त २७ वर्षांचे असून मी कॉंग्रेसला ४० वर्षे दिली आहेत. तसेच सूरज ठाकूर मैदानात काम करत असताना मी त्यांना पाठिंबा देतच आहे. मात्र मी झिशनला काम करताना कधी पाहिले नाही.
झिशान सिद्दीकी यांच्या नाराजीसाठी दोन वेगळी कारणे दिली जात आहेत. पहिले कारण म्हणजे नुकतेच मुंबई काँग्रेसतर्फे एका साहित्य किटचे वितरण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी स्थानिक आमदार असूनही झीशन यांना आमंत्रित करण्यात आले नाही. तसेच झिशान यांच्याविरोधात काम करणाऱ्यांना पक्षात बळ दिले जात आहे. या व्यतिरिक्त भाई जगताप यांनी नुकतेच पक्षामध्ये काही कार्यकर्त्यांना पुन्हा सामील केले, त्यांच्या विरोधात झिशानने सन २०१९ मध्ये तक्रार केली होती.