मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या राजकारणात काही ना काही शाब्दिक वाद सुरूच आहे, सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत हे देखील अशाच एका वादात सापडले आहेत. कारण खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच राऊत बाजूला थुंकले. त्यानंतर लगेच सगळ्यांकडून राऊत यांच्यावर टीका होऊ लागली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही संजय राऊतांच्या या कृत्यावर परखड भाष्य केले. त्यानंतर आता संजय राऊत यांची अजित पवारांवर पलटवार करताना जीभ घसरली. अजित पवार यांच्या धरणाबद्दलच्या खूप वर्षापूर्वीच्या एका वक्तव्याचे त्यांनी उदाहरण दिले.
अजितदादांनी दिली ही प्रतिक्रीया…
पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत काल ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यांच्या या कृतीचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. संजय राऊत हे सध्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत. याबाबत आज माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकाही केली आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्याच वेळी अजित पवारांनी म्हटले की, कृती करताना तारतम्य बाळगावे, असे राऊतांचे नाव न घेता सुनावले. त्यानंतर राऊत यांनी पुन्हा अजित पवारांवर कठोर शब्दात टीका केली. मात्र अजित पवार यांनी पुन्हा संजय राऊत यांना सल्ला दिला आणि त्यांनी दोन शब्दात नो कमेंट म्हणत यावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, ‘संजय राऊत बोलल्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसे आहे, आम्ही त्यांचा आदर करतो. पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.’
संजय राऊतांनी दिले हे स्पष्टीकरण
सर्व स्तरातून टीका होत असताना संजय राऊत यांनी मात्र आपली प्रतिक्रिया देताना आपल्या थुंकण्याचे समर्थन केले. यावेळी त्यांनी सावरकर यांचे उदाहरण दिले. सावरकरही थुंकले होते. रोज १३० कोटी जनतेला माफी मागावी लागेल. रोज कोणी ना कोणी थुंकत असतात. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. मी राजकीय नेत्यांवर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो, हा फरक आहे.
तसेच अजित पवारांवर टीका करताना राऊत म्हणाले की, धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणे चांगले. तसेच ज्याचे जळते त्याला कळते. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळे भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. संकटे येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, अशी टीकाही त्यांनी अजितदादांवर केली. ज्याने महाराष्ट्राशी, शिवसेनेशी, ठाकरे कुटुंबियांशी बेईमानी केली. त्यांचे नाव घेतल्यावर माझी जीभ चावली गेली त्यातून मी थुंकलो. माझ्याइतके चांगले मानसिक संतुलन कुणाचे नाही. मात्र माझ्यामुळे अनेकांचे संतुलन बिघडले आहे असा टोलाही राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
Politics MP Sanjay Raut on NCP Ajit Pawar