मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीचे रहस्य एकाचवेळी उलगडत नसले तरीही टप्प्याटप्प्याने गौप्यस्फोट होत आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला असून पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवारांसोबतच बैठका झाल्या होत्या, असे त्यांनी म्हटले आहे.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत अंतर वाढले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले. पहिले अडिच वर्षे आमचा मुख्यमंत्री असेल आणि नंतर तुमचा अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यात युतीचे बिघडले आणि स्थिर सरकार मिळणार नाही, हे निश्चित झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठका सुरू झाल्या. राज्यात एक वेगळीच आघाडी जन्माला येण्याचे संकेत मिळाले. पण हे सारे सुरू असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपथविधी उरकला.
फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. मात्र ऐनवेळी अजितदादांना सोडून बरेच आमदार शरद पवारांच्या एका हाकेवर माघारी गेले. दादा एकटे पडले आणि पर्याय नसल्याने त्यांनी राजीनामा दिला. हे सारे कसे काय घडले, याची चर्चा आजही होते. राज्याच्या राजकारणातील ही ऐतिहासिक घटना सर्वांसाठी रहस्य ठरली. पण रिपब्लिक वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र यांनी शरद पवार आणि पहाटेच्या शपथविधीचे काय नाते आहे, ते सांगितले. ‘पहाटेच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचे निश्चित झाले होते.
शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. अजितदादा आणि मला सगळे अधिकार देण्यात आले. आम्ही दोघे राज्यातील सरकारचे नेतृत्व करणार, हेही शरद पवार यांनीच ठरवले. आणि तीन दिवस आधी शरद पवार यांनी माघार घेतली,’ असे देवेंद्र म्हणाले. मुख्य म्हणजे फडणवीस यांनी प्रथमच एवढ्या स्पष्टपणे या विषयावर बोलल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगायला लागली आहे.
त्यांनी खंजीर खुपसला, यांनी वापर केला
उद्धव ठाकरे आमच्यासोबत निवडणूक लढले. एकत्र निवडणूक लढल्यानंतर जो फायदा व्हायचा तो झालाच. त्यानंतर त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. शरद पवार आमच्यासोबत निवडणूक लढले नव्हते, त्यांनी आमचा वापर केला, रणनिती आखली आणि दिशाभूल करून निघून गेले, असा आरोप देवेंद्र यांनी केला.
शरद पवारांवर विश्वास होता
आमचा शरद पवारांवर विश्वास होता. त्यांच्याच सांगण्यावरून सगळी तयारी झाली. पण त्यांनी ऐनवेळी दिशा बदलली. आमच्यापुढे मात्र पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही पहाटे शपथ घेतली. शरद पवारांनी ऐनवेळी माघार घेतली नसती तर राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार असते, असेही फडणवीस म्हणाले.