ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या १४ जून रोजी वाढदिवस आहे. यादिवशी मनसैनिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. तसेच, भेटवस्तूही राज यांना दिल्या जातात. मात्र, यंदाच्या वाढदिवसाला राज यांनी मनसैनिकांना एक आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की,
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र
दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात.
पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.
सकाळी ८:३० ते १२:०० ह्या वेळेत मी उपस्थित असेन. तेंव्हा भेटूया १४ जूनला.
आपला नम्र,
राज ठाकरे
Politics MNS Raj Thackeray Birthday Appeal