मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हळूहळू पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्दयावर परतत असल्याचे संकेत मिळत आहेत. दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये ते अयोध्या दौर्यावर जाणार आहेत. त्यामध्ये हिंदुत्वाच्या अजेंड्याला पुन्हा धार दिली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे नव्या अजेंड्यानुसार दिसण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी मनसेने आपला झेंडा बदलला होता. त्यानंतर राज ठाकरे हिंदुत्वाचे मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यांचा अयोध्या दौरा याचेच संकेत देत आहे. साध्वी गुरुमाँ कंचन गिरी आणि जगद्गुरू सूर्याचार्य महाराज यांनी सोमवारी राज ठाकरे यांची दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यादरम्यान हिंदूराष्ट्राच्या संकल्पनेबद्दल चर्चा झाल्याचे समजते. तत्पूर्वी साध्वी कंचनगिरी आणि सूर्याचार्य महाराज यांनी शिवाजी पार्क येथील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली अर्पण केली.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, की हिंदू राष्ट्राची संकल्पना पूर्ण करण्यासाठी संतांना राज ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. परंतु कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे हा दौरा स्थगित करण्यात आला होता. आता डिसेंबरमध्ये राज ठाकरे अयोध्येत जाऊ शकतात. अयोध्येतील वेगवेगळ्या आखाड्यांच्या अनेक साधू-संतांनी राज यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले आहे. आजोबा-पणजोबाच्या काळापासून हिंदुत्व त्यांच्या रक्तात आहे. राज ठाकरे प्रखर हिंदुत्वासाठी प्रभावीपणे काम करू शकतात. उत्तर भारतीयांबाबत त्यांच्या मनात दुर्भावना किंवा द्वेष नव्हता आणि आताही नाहीय. हे माध्यमांनीच रंगवलेले चित्र आहे. तेव्हा त्यांच्या मनात राज्याच्या विकासाची भावना होती. २३ ऑक्टोबरला भांडूपमध्ये होणार्या मनसेच्या सभेत सगळ्या प्रश्नांचे उत्तर राज ठाकरे देणार आहेत.
‘उत्तर भारतीयांबद्दल द्वेष नाही’
यूपी, बिहारच्या नागरिकांबद्दल राज ठाकरे यांच्या मनात द्वेष नाही, असे साध्वी कंचन गिरी यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर समोर आले पाहिजे. उत्तर भारतीयांबद्दल त्यांच्या भूमिकेबाबत माझ्याही मनात शंका होती. त्याचा उल्लेख त्यांच्या चर्चा करताना केला. परंतु उत्तर भारतीयांबद्दल राज यांच्या मनात कोणताच द्वेष नाही. हिंदुत्वाची विचारधारा आवडली असेल तर त्यांनी भाजपसोबत आले पाहिजे. अयोध्येला आल्यावर संत समाज त्यांचे जोरदार स्वागत केले जाईल, असे साध्वी कंचन गिरी यांनी सांगितले.