मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एखाद्या पक्षाशी गट्टी होण्याची लाख कारणं असतात, पण त्यांचं बिनसण्यासाठी एकच कारण असतं ते म्हणजे त्यांची रोखठोक भूमिका. एखाद्या घटनेमागे राजकारण होताना दिसलं की राज यांचं बिनसलंच समजा. दोन दिवसांपूर्वी जागतिक मराठी संमेलनात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली आणि आता त्यांच्या पक्षाचे नेते भाजपवर थेट आरोप करताना दिसत आहेत. यामुळे राज आणि भाजप यांच्यातील दरी वाढत चाललीय का, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.
राज ठाकरे यांचा स्वतःचाच प्रभाव एवढा आहे की, त्यांच्या पक्षाचे आमदार-खासदार किती आहेत याचा विचार न करता सर्व राजकीय पक्ष त्यांच्याशी जुळवून घेतात. राज ठाकरेंच्या जाहीर सभांमध्ये आपल्याला त्याची प्रचिती येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातलाच प्राधान्य देणे, हे चुकीचे आहे, अशी टिका राज यांनी पुण्यात जागतिक मराठी संमेलनात झालेल्या प्रकट मुलाखतीत केली होती. त्याची चर्चा ताजी असतानाच त्यांच्या पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांनी राज यांचा अयोध्या दौरा रद्द होण्यामागे भाजपचाच हात असल्याची टिका केली आहे. भाजपनेच राज यांच्या दौऱ्यात खोडा टाकला, अशी टिका त्यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हा भाजपच्या एका गुंडाने अयोध्येत येऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. पण त्यावेळी राज्य आणि केंद्रातील भाजपले लोकांनी मौन व्रत घेतले होते. त्यामुळे भाजपनेच हा दौरा रद्द करण्यासाठी डाव रचला, असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.
‘सरकारला जागा दाखवू’
राज ठाकरे यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणाऱ्या सरकारला लाज वाटत नाही का, असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला आहे. या केसेस मागे घेतल्या नाही तर शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवू, असा इशारा महाजन यांनी दिला आहे.
राऊत पवारांच्या पे-रोलवर
संजय राऊत हे शरद पवार यांच्या पे-रोलवर आहेत. पवारांना दिल्लीत कुणी महत्त्व देत नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या वरीष्ठांना पटवले आणि ठाकरेंना मुख्यमंत्री केले. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असा शब्द उद्धव यांनी बाळासाहेबांना दिला होता. पण मुलाला मंत्री करायचे असल्याने उद्धव स्वतःच मुख्यमंत्री झाले, अशी टिकाही त्यांनी केले.
शिवसेनेचं वाट्टोळं केलं
शरद पवार आणि संजय राऊत यांनी मिळून शिवसेनेचं वाट्टोळं केलं, अशीही टिका प्रकाश महाजन यांनी केली आहे. शरद पवार यांना बाळासाहेबांनी मासे खाऊ घातले, पण राजकीय संबंध कधीच जोडले नाही. याचा राग त्यांच्या मनात होता. आणि इकडे केंद्रात मंत्रीपद मिळाले नाही, संजय राऊत यांच्या मनात राग होता. या दोघांनी मिळून सेनेचं वाट्टोळं केलं, असे प्रकाश महाजन म्हणाले.
Politics MNS BJP Raj Thackeray Recent Happening
Prakash Mahajan Ayoddhya Tour