जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अफलातून उत्तर दिले आहे. त्यांच्या या अनोख्या उत्तराने हशा पिकविला असून उद्धव ठाकरे एकाकी पडल्यावर भाष्य केले आहे.
स्वत:च्या आगळ्यावेगळ्या भाषणशैलीसाठी गुलाबराव पाटील प्रसिद्ध आहेत. ते कायम चर्चेत असतात. कधी ते डीजेवर ठेका धरतात तर कधी कव्वाली गातात. बरेचदा विरोधकांवर बोचरी टीका करून लक्ष वेधून घेतात. असेच एक विधान त्यांनी शिंदेंसोबत जाण्याच्या निर्णयावर केले आहे.
ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. मात्र, त्यांच्यासोबत मी पार शेवटी गेलो. राज्यातील अनेक भागातील आमदार शिंदे सोबत गेले. जळगावचे आमदारही गेले, मात्र तोपर्यंत मी निर्णय घेतलेला नव्हता. नागपूर ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय केलं असतं? असा सवाल करत गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा सत्तातरांच्या वेळचा घटनाक्रम अधोरेखित केला आहे. केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील साळवे गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या निमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील हे भूमिपूजनासाठी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले
गुलाबराव पाटील यांनी यावेळी सत्तांतर होण्याच्या आगोदर माझ्या मनात नेमकं काय चाललं होत? हा निर्णय घेण्यामागचं कारण त्यांनी त्यांनी उलगडून दाखवलं. ते म्हणाले की, सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं. मात्र या सगळ्या सत्तातरांच्या काळात मी तर ३२ नंबरला गेलो. माझ्या आधी ३१ जण गेले होते. सत्ता समीकरण बदलण्यासाठी आधीच जळगाव जिल्ह्यात पाच आमदार गेले होते. त्यापैकी चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले होते, असे पाटील म्हणाले.
विरोधकांनी करावा विचार
मंत्रीपद मला सहज मिळालेले नाही. माझ्या राजकीय आयुष्यात १५ ते २० वेळा जेलमध्ये गेलो होतो. सर्व आयुष्य संघर्षात घातलं. त्यावेळेस सत्तेची लालसा केली नाही, मी तर मंत्रीपद सोडून गेलो होतो. माझी आमदारकीही गेली असती. मात्र एकनाथ शिंदेंसोबत जाऊन एक सट्टा खेळलो. हिंदुत्वासाठी सट्टा खेळलो, भगवा झेंडा वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सोबत गेलो. त्यामुळे विरोधकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असेदेखील गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
Politics Minister Gulabrao Patil on Uddhav Thackeray