नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वास आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या दादा भुसे यांना मंत्रीमंडळाच्या खाते वाटप बदलात चांगलाच फायदा झाला आहे. या खाते वाटपात त्यांना सार्वजनिक बांधकाम हे खाते मिळाले आहे. याअगोदर सत्ता बदलानंतर त्यांची कृषी खात्यावरून थेट बंदरे आणि खनिकर्म खात्यावर बोळवण केली होती. त्यामुळे ते नाराजही होते. पण, या बदलात त्यांना काम करता येण्यासारखे खाते मिळाले आहे. त्यातून जिल्ह्याला त्याचा फायदा होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा राष्ट्रवादीचा गट आल्यामुळे विस्तार झाला. त्यात शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. पण, या विस्तारानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाते वाटप करतांना मंत्रिमंडळात काही बदल केले. त्याचा फायदा दादा भुसे यांना झाला आहे. भाजप – शिवसेना युतीच्या काळात दादा भुसे यांना अगोदर राज्यमंत्रीपद देतांना ग्रामविकास व नंतर सहकार खाते देण्यात आले होते. पण, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री करुन कृषीमंत्री करण्यात आले. पण, सत्ताबदलानंतर शिंदे गटाकडून त्यांना बंदरे आणि खनिकर्म करण्यात आले. पण, आता त्यांना सार्वजनिक बांधकाम खाते देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे.
भुसे हे मालेगाव बाह्य मतदार संघाचे आमदार आहेत. याअगोदर हा मतदार संघ दाभाडी मतदार संघ म्हणून ओळखला जात होता. स्वातंत्र्यानंतर हा मतदार संघ कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. भाऊसाहेब हिरे, डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि अलीकडे २००४ पर्यंत या मतदार संघात हिरे घराण्याचे वर्चस्व होते. पुष्पाताई नंतर प्रशांत हिरे यांनी एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत मंत्रीपद मिळवले. २००४ साली दाभाडी मतदार संघात दादा भुसे यांचा प्रवेश झाला शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंड करत दादा भुसेंमागे शक्ती उभी केली. भुसे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत प्रशांत हिरे यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी सलग विजय मिळवला.
खाते बदलले, पालकमंत्रीपदाचे काय
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भुसे यांच्याकडे धुळे आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. दादा भुसे हे सध्या नाशिकचे पालकमंत्री आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे जे दिग्गज नेते मंत्री झाले आहेत त्यात छगन भुजबळ यांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद हे भुजबळांकडे जाणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास भुसे हे कुठल्या जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणार अशी चर्चा सुरू आहे.