मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्र विषयी देशभरात वाद सुरू असताना दुसरीकडे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पदवी प्रमाणपत्र संदर्भात एक वेगळाच वाद सुरू आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता, आता पुन्हा त्यांच्या पदवी संदर्भात वादळ उठल्याने ते पुन्हा वादाच्या भरात सापडणार आहेत, असे दिसून येते.
चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या युवासेनेने केला आहे. चंद्रकांत पाटलांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन अर्ज करत एका दिवसात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात आता युवासेना आक्रमक झाली आहे. पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पदाचा गैरवापर करून आपल्या हरवलेल्या पदवी प्रमाणपत्राची प्रत मुंबई विद्यापीठातून एका दिवसांत मिळवल्याचा आणि संपूर्ण प्रक्रिया डावल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार मुंबई विद्यापीठाच्या संलग्न असलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाची चंद्रकांत पाटील यांनी सन १९८० पदवी मिळाली मात्र त्याचे प्रमाणपत्र हे त्यांना १९८९ मध्ये मिळाले होते, मात्र दरम्यान सदर पदवी प्रमाणपत्र हरवल्याने त्यांनी मागील महिन्यात २३ तारखेला मुंबई विद्यापीठात आपल्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने ऑफलाईन अर्ज केला.
वास्तविक पाहता ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद केलेली असताना सुद्धा मंत्री असल्याने त्यांचा अर्ज मुंबई विद्यापीठाने स्वीकारला. त्याच दिवशी त्यांनी पदवी गहाळ झाल्याची एफआयआर कॉपी सुद्धा त्यात जोडली, आणि विशेष म्हणजे याच २३ मार्चलाच त्यांनी आपली पदवी प्रमाणपत्राची प्रत सुद्धा मिळवली. त्यामुळे दबाव टाकून एका दिवसात पदवी प्रमाणपत्राची प्रत मिळवल्याचा युवा सेनेचा आरोप आहे.
मुंबई विद्यापीठ असो की, कोणत्याही विद्यापीठात एका दिवसातच अर्ज केल्या बरोबर पदवी प्रमाणपत्राची प्रत मिळू शकत नाही, हा एक प्रकारे विक्रमच म्हणावे लागेल ! आणि असा विक्रम मंत्री महोदय करू शकतात, म्हणजे एक प्रकारे दबाव टाकूनच हे काम झाले आहे, असेही म्हटले जाते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या राजीनामाची मागणी युवा सेनेकडून करण्यात येत आहे.
Politics Minister Chandrakant Patil Trouble Degree Certificate