नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षातील खासदारांचा क्लास घेतला. पक्षाद्वारे सुरू असलेल्या महासंपर्क अभियानात सक्रिया नसलेल्या खासदारांना नड्डा यांनी चांगलेच सुनावले असल्याची माहिती आहे. नड्डा यांनी घेतलेल्या शाळेने खासदारांमध्ये खसखस पिकली असून महासंपर्क अभियानाला गांभीर्याने घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या काळात राबवलेल्या योजना तसेच, कल्याणकारी निर्णय आदींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यमान खासदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ३० मे ते ३० जून काळात ही महाजनसंपर्क मोहीम राबवयाची असून आता केवळ १५ दिवस उरलेले आहेत. या मोहिमेअंतर्गत ५० जाहीर सभाही घेतल्या जाणार होत्या. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार होते. मात्र, ३१ मे रोजी मोदींची राजस्थानमध्ये जैसलमेर येथे प्रारंभी सभा झाली होती. त्यानंतर, पंतप्रधानांच्या उपस्थितीत जाहीर सभाही झालेल्या नाहीत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपने देशभर महाजनसंपर्क मोहीम सुरू केली असली तरी, पक्षाच्या खासदारांकडून या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले आहे. खासदारांच्या निष्क्रियतेमुळे नाराज झालेल्या पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी दूरसंवाद बैठकीत खासदारांना कानपिचक्या दिल्याचे समजते.
दक्षिणेतील पराभवातून धडा
दक्षिणेतील कर्नाटकमधील सत्ता गमावल्यानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणूक गंभीरतेने घेण्याचा संकल्प सोडला आहे. विरोधकांना कमी न लेखता योग्य नियोजनातून विजय सुकर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने महासंपर्क अभियान सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला दहा महिन्यांचा कालावधी उरला असून त्यापूर्वी भाजपसाठी महत्त्वाच्या असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूकही होणार आहे. निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी भाजपने महाजनसंपर्क मोहीम राबवलेली आहे. कर्नाटकच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या खासदारांनी जनसंपर्काकडे दुर्लक्ष करू नये, अशी सूचना नड्डा यांनी केल्याची माहिती आहे.