पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापनदिन सोहळा यंदा पुण्यात साजरा होत आहे. याचनिमित्ताने मनसेने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे निश्चित केले आङे. आज सायंकाळी ५ वाजता येथील गणेश कला क्रीडा केंद्र हे मेळावा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातून मनसैनिक या मेळाव्यासाठी दाखल होत आहेत. या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांचा भव्य मेळावा आज पुण्यात होत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक सह प्रमुख महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेला या मेळाव्यास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. ते काय भूमिका घेतात, कुणावर तुटून पडतात तसेच आगामी निवडणुकीत मनसेचा प्रमुख अजेंडा काय असेल हे आजच्या मेळाव्याने स्पष्ट होणार आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मनसैनिक मोठ्या संख्याने पुण्यात दाखल होत आहेत.
आणखी अडीच वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून राज हे आताच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीकडे बघत आहेत. या निवडणुकीत चांगले यश मिळाल्यास विधानसभेत चांगली कामगिरी करता येणार आहे. त्यामुळेच राज यांनी मोठी रणनिती आखल्याचे बोलले जात आहे.