मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढवायचा निर्णय तर महाविकास आघाडीने घेतला, पण खरा संघर्ष सुरू होतो जागावाटपाच्या निर्णयावरून. त्याची सुरुवात लवकरच होणार आहे. सध्या तिन्ही पक्षांकडून लोकभेसाठी जागांची चाचपणी केली जात आहे.
लोकसभेत तिन्ही पक्ष गेल्यावेळच्या कामगिरीच्या आधारावर जागा मागण्याची शक्यता आहे. पण यात मोठी फजिती काँग्रेसची होणार आहे. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली होती. बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरची जागा जिंकून महाराष्ट्रात काँग्रेसची पत राखली होती. त्यामुळे आता ज्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार होते, त्या ठिकाणी उमेदवारीचा दावा काँग्रेस करू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसने तर जिंकलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्या दोन्ही जागांवर दावा ठोकण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे बहुतांश खासदार शिंदे गटात गेल्यामुळे त्या जागांवर दावा ठोकायचा की जुन्याच खासदारांची घरवापसी करायची, अश्या द्विधा मनःस्थितीत उद्धव गट आहे. कारण शिंदे गटासोबत गेलेले खासदार लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्याच मतदारसंघात उतरणार, हे निश्चित आहे.
अश्या परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणखी एका भूमिकेत आहे. ती म्हणजे ज्या जागा दोन्ही पक्षांना अनेक वर्षे जिंकता आलेल्या नाहीत, त्या जागा शिवसेनेसाठी सोडायच्या. पण आता खरी गंमत अशी आहे की, शिवसेनेसाठी जागा सोडल्यानंतर त्यांच्याकडून कोणती जागा घ्यायची, याचाही विचार काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये केला जात आहे. लवकरच जागावाटपासाठी बैठकांच्या फेऱ्या होतील, असे महाविकास आघाडीतील सूत्रांकडून कळते.
तयारी सुरू झाली
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्नाटकातील निकालानंतर महाविकास आघाडीला मोठी आशा वाटत आहे, तर भाजपने गाफील राहणे योग्य नसल्यामुळे तयारी सुरू केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या पुण्यात कार्यशाळा सुरू आहेत. तर काँग्रेसमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. उद्धव गटाने मतदारसंघानुसार बैठका घेऊन चाचपणी सुरू केली आहे.
Politics Mahavikas Aghadi Seat Sharing Trouble