मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकमेकांच्या हातात हात घालून संपूर्ण राज्यासमोर वज्रमुठ पक्की असल्याचे दाखविणारे महाविकास आघाडीतील नेते आता जागावाटपावरून एकमेकांच्या उभे ठाकले आहेत. प्रत्येकजण आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जागावाटपावरून महाविकास आघाडीत रणांगण पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत राज्यात सर्वांत मोठा पक्ष भाजप होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला शिवसेना आणि तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे राष्ट्रवादी व काँग्रेस अशी स्थिती होती. आता जागावाटप करताना ठाकरे शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्य किमान १८ जागांवर ठाम आहे. तर राष्ट्रवादीने आपल्यामुळे वज्रमुठ कायम असल्याचे वारंवार जाणवून देत आम्ही मोठा भाऊ असल्याने जागावाटपात मोठा हिस्सा आमचा असेल, असे स्पष्टच केले आहे. त्यात त्यांनी काँग्रेसलाही सोबत जोडले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे ७५ टक्के आणि शिवसेनेकडे २५ टक्के जागांची उमेदवारी जाईल, असे सध्यातरी राष्ट्रवादीने ठरविले आहे. पण ७५ टक्क्यांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला फार काही जागा देण्याच्या मनःस्थितीत ते नाहीत. कारण गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला अख्ख्या महाराष्ट्रात एकच जागा जिंकता आली आहे. २०१४ मध्ये अशोक चव्हाण आणि २०१९ मध्ये बाळू धानोरकर यांनीच काँग्रेसची लाज राखली होती.
गेल्यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेच्या चारच जागा जिंकता आल्या असल्या तरीही किंग मेकर म्हणून स्वतःची प्रतिमा त्यांनी तयार केली आहे. त्यामुळे जागावाटपात शिवसेना आणि काँग्रेसला दुय्यम स्थान देत राष्ट्रवादी आपला डमरू वाजविण्याच्या पूर्ण तयारीत आहे.
ठाकरेंकडे उरलेच काय?
ठाकरे गटाने २०१९ मध्ये लोकसभेच्या १८ जागा जिंकल्या. त्यापैकी १३ खासदार शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे ठाकरेंकडे फक्त पाचच खासदार उरले आहेत. अश्यात जागावाटपामध्ये मोठा भाऊ म्हणून दावा करण्याचा त्यांचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली आहे.
भाजपने ओढले तर?
लोकसभा निवडणुकीला अद्याप १० महिने आहेत. पण आतापासूनच लोकसभेच्या जागावाटपांवर चर्चा केल्या आणि जागा निश्चित केल्या तर मोठा अनर्थ घडण्याची भीती महाविकास आघाडीतील नेत्यांना आहे. कारण ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे नेते भाजपने ओढले तर काय करायचे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांना वाटत आहे.
Politics Mahavikas Aghadi NCP Congress UBT Shivsena