मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे ट्रीपल इंजीन सरकार राज्यात अस्तित्वात असल्याचे म्हटले खरे पण हे इंजीन काही पुढे जायचे नाव घेत नाही. कारण या गाडीतील प्रवाशांचा जीव सगळा खातेवाटपात अडकला आहे. राज्याला प्रथमच दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. तसेच, सरकारचे संख्याबळ हे जवळपास २०० आहे. असे असतानाही खाते वाटपाचे घोडे नेमके कुठे अडले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकतर शिंदे गट आणि भाजपमधील बरेच आमदार मंत्रीपदाची आस लावून बसले आहेत. गेल्या वर्षभरापासून ते मंत्रीमंडळ विस्ताराच्या फक्त घोषणाच ऐकत आहेत. आणि आता तोंडाशी घास आला आहे, असे वाटत असतानाच आणखी एक भागीदार तयार झाला. इकडे मंत्रीमंडळ विस्तार व्हायचाच असताना राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाचीही शपथ घेतली आणि तेही खातेवाटपाच्या शर्यतीत उभे झाले. त्यामुळे केवळ शिंदे गटाच्या नव्हे तर भाजपच्याही आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
बरं तेही असू द्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तेत जबरदस्त एन्ट्री होऊन आता एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. आणि तरीही ना मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या व भाजपच्या इच्छुकांचा नंबर लागला ना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे खाती सोपविण्यात आली. विशेष म्हणजे जोपर्यंत आम्ही मंत्रीमंडळात येत नाही तोपर्यंत अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचे खातेवाटप व्हायला नको, अशी आक्रमक भूमिका शिंदे गटाच्या आमदारांनी घेतली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांचे दुःख ते स्वतःच जाणतात. कारण शपथ तर घेतली, मंत्रीही झाले, मंत्रीमंडळाच्या बैठकांना हजर राहू लागले… पण रोज काय करायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. खातेच मिळाले नसल्याने मंत्रालयात जागा मिळालेली नाही आणि जागा मिळालेली नाही त्यामुळे कुठे बसायचे आणि काय करायचे, असे असंख्य प्रश्न त्यांना पडत आहेत. परिणामी या नऊ मंत्र्यांपैकी कुणीही मंत्रीमंडळाची बैठक वगळता एकदाही मंत्रालयात भटकलेले नाहीत.
दादांमुळे वाढले टेंशन
अजितदादांनी सत्तेत प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांचे टेंशन वाढले आहे. कारण अजितदादा साधेसुधे खाते घेऊन शांत बसणार नाही, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडे महत्त्वाची खाती गेल्यास आपल्या हाती काय लागणार अशी चिंता त्यांना सतावत आहे.
गृह की अर्थ?
दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या एका अधीसूचनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे गृह खात्याचा उल्लेख होता. तर अर्थ खात्यासाठी मा. मंत्री महोदय एवढाच उल्लेख होता. त्यामुळे अजितदादांकडे अर्थखाते जाण्याची शक्यता बळावली आहे. तसे झाल्यास शिंदे गटाकडून आणखी एक महत्त्वाचे खाते हिरावले जाण्याची शक्यता आहे.