नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असतानाच काँग्रेसने आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात महाविकास आघाडी कायम राहिली नाही तरीही आम्हाला काहीच फरक पडत नाही. आमचा प्लान तयार आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केली आहे.
राज्यातील सरकारमध्ये मोठे बदल होणार आणि त्यात एकनाथ शिंदे पायउतार होऊन अजितदादा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला बळ देणारी विधाने महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनच करण्यात आली. एकीकडे अजित पवार यांच्या संशयास्पद भूमिका आणि हालचाली, दुसरीकडे सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी मोठे बदल होण्याचे संकेत देणे यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत सरकारमध्ये जाणार, अशी चर्चा होऊ लागली आहे.
यात उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली. पण काँग्रेस अद्याप कुठल्याही हालचालींच्या भूमिकेत नाही. पण आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी निवडणुकांच्या काळात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सहा विभागीय आयुक्त मुख्यालयांच्या ठिकाणी सभा होणार आहेत. आणि सातवी जाहीर सभा मुंबईत होईल, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली. जनतेच्या मनात काय आहे हे निवडणुकीनंतरच दिसेल. कारण काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन ताकदीने लढत आहे, असेही ते म्हणाले.
त्याचाच मुख्यमंत्री…
‘महाविकास आघाडी कायम राहावी, अशी आमची इच्छा आहे. महाविकास आघाडी फिसकटलीच तरीही आमचे सगळे प्लान तयार आहेत. पण आघाडी कायम राहिली तर ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार आहोत,’ असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक आमचेच
कर्नाटकमध्ये काँग्रेसच्याच सर्वाधिक जागा येतील, असे एक्झीट पोलने म्हटले आहे. काँग्रेस हा एकमेव पर्याय कर्नाटकात आहे. भाजपच्या विरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे एक्झिट पोलपेक्षाही जास्त जागा मिळतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
रिफायनरी प्रकल्पाबाबत काही शंका असतील तर भाजपा सरकार स्थानिक जनतेच्या शंकांचे निरसन का करत नाही? पोलीसांचा फौजफाटा घेऊन कसले सर्वेक्षण करता? ही दादागिरी, हुकूमशाही चालू देणार नाही: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले pic.twitter.com/WOv1ZT7Ba5
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 26, 2023
Politics Maharashtra Congress Chief Nana Patole Mahavikas Aghadi