मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची स्वतःच्या पक्षावरील नाराजी जगजाहीर आहे. ही नाराजी त्यांनी बरेचदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. अलीकडेच माझा कट्ट्यावर त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाविषयी काही गौप्यस्फोट करताना वडिलांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारण बदलले. आताचा काळ हा अनिश्चिततेचा आहे, असे पंकजा म्हणतात. ‘सध्याचा काळ हा राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अनिश्चिततेचा आहे. आम्ही नेहमीच विरोधात राहिलो, पण सत्ता नसतानाही आमच्याकडे आत्मविश्वास होता. आजच्या राजकारण्यांमध्ये ते बघायला मिळत नाही,’ असे त्या म्हणाल्या. राजकारण सोडण्याचा विचार रोजच मनात येतो, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
राजकारण सोडून द्यावं, असा विचार रोजच मनात येतो. अनेकवेळा राजकारणात आपल्याला नको असलेली गोष्ट करावी लागते. पण पर्याय नसतो. राजकारणात निगरगट्ट राहावे लागते. अनेक चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. पण माझ्या स्वभावात ते नाही. त्यामुळे रोजच राजकारण सोडण्याचा विचार येतो आणि पुन्हा जिद्दीने उभी होते. पण तरीही तडजोड करून राजकारण करू शकत नाही, असे पंकजा यांनी सांगितले. १ जून २०१४ रोजी मी बाबांजवळ माझी राजकारण सोडण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर ३ जूनला बाबांचा मृत्यू झाला, हा भावनिक प्रसंगही त्यांनी सांगितला.
मनातली मुख्यमंत्री
मला अनेक लोक ‘मनातली मुख्यमंत्री’ म्हणून संबोधतात. पण याचा मला कधीच त्रास झाला नाही. ज्याला हे लेबल मला चिटकवायचे असेल त्याला ते करू द्या. उलट त्यांचे मी आभारच मानेन, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
सगळे एकत्र होतो
माझा कट्ट्यावर खासदा प्रितम मुंडे देखील उपस्थित होत्या. त्यांनी मुंबईतील रामटेक बंगल्यावरील आठवणींना उजाळा दिला. त्या काळात आम्ही सगळे एकत्र होतो. बाबा रात्री घरी आले की बाबांसोबत आम्ही, धनंजय, यशत्री सारे एकत्र डायनिंगवर जेवायला बसायचो. त्यात मुंडे-महाजन कुटुंबातील सर्वांचाच सहभाग असायचा, असेही प्रितम म्हणाल्या.
Politics Maharashtra BJP Leader Pankaja Munde