मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पहिल्याच जाहीर सभेत काका शरद पवार यांच्यावर हल्ला चढविला. भाजपसोबत जाण्याची इच्छा २०१४ पासून होती. त्यासाठी वेळोवेळी झालेल्या प्रयत्नांसाठी शरद पवार यांनी साथ दिल्याचे गुपित त्यांनी उघड केले. तसेच आता वयाच्या ऐंशीव्या वर्षी काकांनी थांबावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे, असे आवाहनदेखील केले.
चार दिवसांपूर्वी झालेल्या नवीन सत्ताकारणानंतर प्रथमच बुधवारी शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादीबाबत जाहीर भूमिका घेतल्या आहेत. या अंतर्गत दोन्ही बाजूनू सभा सुरू आहे. अशात अजित पवारांनी त्यांच्या भाषणात काकांवर टीका करताना भाजपसोबत जाण्याची इच्छा त्यांचीदेखील होती आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याचा दावा दादांनी केला आहे. २०१४मध्ये वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितले. जर त्यांच्यासोबतच जायचे नव्हते तर आम्हाला का तिथे पाठवले, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना शरद पवारांनी एका आमदाराला धमकावल्याचेही अजितदादा म्हणाले आहेत. सभेदरम्यान शरद पवारांनी आता तरी थांबावे असे सांगत त्यांना भाविकन साद घालण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला आहे. ते म्हणाले,‘शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. मात्र, माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो. माणसाने कधीतरी थांबावे. तरुणांना संधी कधी देणार? तुम्ही आशीर्वाद द्या, मार्गदर्शन करा, चुकले तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा. कान धरा. मार्गदर्शन करा.’ ‘शरद पवारांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आणि नंतर मागे घेतला, तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावं तर ती म्हणाली, ते हट्टी आहेत, ऐकणार नाहीत,’ असेही अजित पवार म्हणाले.
बाहेर बोलण्यास केला मज्जाव
२१०४ मध्ये भाजप-शिवसेने सत्ता स्थापन केली. त्याला तीन वर्षे होत नाही तोच २०१७ मध्ये वर्षा बंगल्यावर अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत भाजपने आम्ही शिवसेनेसोबत २५ वर्षे दोस्ती निभावली आहे. ती तोडणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र, याबाबत बाहेर काहीच बोलायचे नाही, असे आम्हाला सांगण्यात आल्याचा दावा अजितदादांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
हसन मुश्रीफांनी केले पत्र ड्राफ्ट
महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ बसत नसल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होते. त्यांची कामे होत नव्हती. त्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ साहेबांनी ५३ विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. तेव्हा आपापली कामे व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावे, अशी विनंती सर्व आमदारांनी केली होती. त्यावेळी माझ्याच कॅबिनमध्ये एक पत्र ड्राफ्ट केले होते, असे सांगत अजित पवार यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे आमदार नाखुश असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
पहाटेचा शपथविधी
२०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी होण्यापूर्वी भाजपसोबत बैठका झाल्या होत्या. त्यावेळी एका बड्या उद्योगपतीच्या बंगल्यावर बैठक झाली. त्यावेळी भाजपचे ४ ते ५ पदाधिकारी आणि आम्ही ४ ते ५ पदाधिकारी होतो. दोन ते तीन बैठका झाल्या. सर्व काही नक्की झाले. आम्ही शपथ घेतली आणि नंतर माघार घेेण्यात आली. या सर्व प्रक्रियेत मला व्हिलन करण्यात आले, असा आरोपही पवार यांनी केला.