मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा ‘इंडिया टीव्ही’ आणि ‘सीएनएक्स’चा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये राज्यात लोकसभेच्या ४८ जागा पैकी भाजपाला २० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर सर्वाधिक उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ११ जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर काँग्रेसला ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
या पोलच्या अंदानुसार भाजपाच्या ३ जागा कमी होणार आहे. एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला फक्त २ जागा मिळणार असून १० जागांचा फटका बसणार आहे. उद्धव ठाकरेंना ६ जागा जागांचा फायदा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४ ही जागा कायम राहाणार आहे. अजित पवारांना २ जागांचा फायदा, तर काँग्रेसला या निवडणुकीत सर्वाधिक फायदा होणार असून त्यांच्या ८ जागा वाढणार असल्याची शक्यता या पोलमध्ये आहे.
या पोलमध्ये मताच्या टक्केवारीनुसार भाजपाला ३२ टक्के, उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला १६ टक्के, काँग्रेस १६ टक्के, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १६ टक्के, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७ टक्के, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५ टक्के आणि अन्य पक्षांना ११ टक्के मते मिळू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकुणच सत्तासंघर्षाच्या नंतर हा पोल समोर आला असून तो सत्ताधारी भाजप महायुतीसाठी धक्कादायक आहे. गेल्या वर्षभरात भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी फोडली. पण, त्याचा फायदा या पोलमध्ये दिसून येत नाही. ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ऱाष्ट्रवादी या निवडणुकीत मोठा धक्का देऊ शकते अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे महायुती व महाविकास आघडीला या पोलमध्ये समसमान जागा दिल्या आहे. भाजप, शिंदे गट व अजित पवार यांचा गट मिळून २४ जागा तर महाविकास आघाडीला २४ जागा मिळू शकतात असे म्हटले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची असणार आहे.