नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने कर्ण व नेत्र दोष तपासणी शिबिरे नियमित आयोजित केली जात आहेत. आतापर्यंत हजारो लोकांचे डोळे तपासण्यात आले आहेत. येत्या काळात संपूर्ण नागपूर मोतीबिंदूमुक्त करायचे आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
ना. श्री. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाला, २७ मे रोजी स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या मेडिकल व्हॅनचे लोकार्पण झाले. त्यानंतर संपूर्ण नागपुरात नेत्र व कर्णदोष तपासणी शिबिरांचे आयोजन सुरू झाले. ‘या शिबिरांतर्गत आतापर्यंत ५ हजार ३४० नागरिकांचे डोळे तपासण्यात आले. यातील ३८७ लोकांना मोतीबिंदू असल्याचे आढळले असून ९० लोकांवर आतापर्यंत शस्त्रक्रिया सुद्धा झाल्या आहेत. नागपुरात एकाही व्यक्तीला मोतीबिंदूचा त्रास असू नये असे माझे प्रयत्न आहेत,’ अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी दिली. या शिबिरांमार्फत आतापर्यंत २ हजार लोकांना चश्म्यांचे वाटप करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्या रुग्णांना मोतीबिंदू आढळत आहे, त्यांच्यावर डॉ. महात्मे हॉस्पिटलमध्ये निःशुल्क शस्त्रक्रिया केली जात आहे.