कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारकडे केलेल्या मागण्या बघता त्यांना नेमके काय हवे आहे, असा प्रश्न वरीष्ठांना पडला आहे. पहिले पालकमंत्री दीपक केसरकर, नंतर महापालिका आयुक्त आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कोल्हापूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना बदलण्याची मागणी केली तेव्हाच काहीतरी गडबड असल्याचे पक्षातील ज्येष्ठांना लक्षात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांचीही बदली करण्याची मागणी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केली. एवढ्यावर समाधान निघत नाही तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना हटविण्याची मागणी केली आहे. भाजपचा एक गट आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यात धुमसत आहे.
महापालिका प्रशासकांची जून महिन्यात बदली झाल्यापासून त्याचा पदभार आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कार्यभार जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडेच आहे. त्यामुळे या तिन्ही पदावरून रेखावार निभावत असलेल्या कार्यशैली विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपबाजी सुरू केली आहे. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील हे भाजपचे बडे नेते असतानाही कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
महापालिकेत सव्वा दोन वर्ष प्रशासक असलेल्या डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मूलभूत प्रश्न सोडवले नाहीत. प्रशासक म्हणून त्या निष्क्रिय असल्याने त्यांची बदली करावी, अशी मागणी भाजपने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एप्रिल महिन्यात केली होती. याच पालकमंत्री दीपक केसरकर यांना अलीकडे भाजपने लक्ष्य केले आहे.
माजी पालकमंत्र्यांची भूमिका नाही
भाजपचे आरोप जिल्हाधिकारी रेखावार यांनी खोडून काढले आहेत. माझ्या निर्णयामध्ये माजी पालकमंत्र्यांची कोणतीही भूमिका नाही. मला ते कोणत्याही सूचना करत नाहीत. काहीजण साशंक असले तरी हे काम निश्चितच लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करीत रेखावार यांनी माझे काम कोल्हापूरकरच सांगतील, असा टोलाही टीकाकारांना लगावला आहे.\
Politics Kolhapur Shinde Faction BJP Conflict
Collector Commissioner Guardian Minister