मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यास उपस्थित १४ श्री सेवकांचा उष्माघाताने तडफडून मृत्यू झाला आहे. यावरुन सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यासंदर्भात टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष्य केले. खारघरच्या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून राज म्हणाले की, राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची दखल घेत तत्कालिन मुख्यमंत्र्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा का. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. यातून त्यांनी राज ठाकरे यांना ६ प्रश्न विचारले आहेत.
सुषमा अंधारे यांचे पत्र खालीलप्रमाणे..
सस्नेह जय महाराष्ट्र !
वि. वि. पत्र लिहिण्यास कारण की, इंटरनेट आणि ई-मेलच्या युगामध्ये आजही आपण पत्रलेखनासारखी आपली अत्यंत प्राचीन परंपरा जतन आणि संवर्धन करीत आहात त्यामुळे पत्राद्वारे हा संवाद आपल्याशी साधण्याचा प्रयत्न करत आहे. खारघर दुर्घटनेच्या संदर्भात किमान चार दिवसांनी का होईना काल आपण व्यक्त झालात हे एका अर्थी बरे झाले..!
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावर कोणीही राजकारण करू नये असे आपले म्हणणेही अगदी समायोचित आहे. पण पुढे आपण कोरोना काळात हलगर्जीपणा झाला…असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही भाषा केली. आपण अत्यंत ज्या पद्धतीने व्यक्त झाला त्या संदर्भात काही प्रश्न उद्भवतात आणि ते विचारलेच पाहिजेत असे वाटते .
दादा, (हे संबोधन दहशतीवाला दादा या अर्थाने नाही तर मोठा भाऊ या अर्थाने वापरले आहे, असे म्हणत त्यांनी कोपरखळी मारली आहे….)
मुद्दा क्र. १ – कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती हे आपल्याला ज्ञात असेलच. पण खारघर मध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी.
मुद्दा क्र. २ – भारतरत्न सारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो आणि त्याचे प्रक्षेपण जगभर केले जाते. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती काय? गर्दीचे योग्य नियोजन का केले गेले नव्हते?
मुद्दा क्र. ३ – आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे – फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. तर याचे राजकारण करू नका असे म्हणणे संयुक्तिक ठरते का ?
मुद्दा क्र. ४ – कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याच्या ऐवजी खासगी पीएम केअर फंडमध्ये निधी द्या, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांचे कोरोना काळात राजकारण करत नव्हते का?
मुद्दा क्र. ५ -:गर्दी टाळणे हाच मोठा उपाय असताना सुद्धा मंदिरे उघडलेच गेले पाहिजेत यासाठी सुपारीबाज लोकांना पुढे करून करून राज्यातली एकूण व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे भाजपा नेते तेव्हा राजकारण करत नव्हते का?
मुद्दा क्र. ६ – सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असताना, जशी मंदिरे बंद होती, वारी बंद होती, तशी आंबेडकर जयंती सुद्धा साजरी झालीच नव्हती. पण मंदिरेच कशी बंद राहिली अशी आवई उठवत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना एवढ्या गंभीर काळामध्ये त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का ?
बर असू द्या दादा मी आपल्याला फार अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही. पण ज्याचे जळते त्यालाच कळते. दादा, खारघरच्या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकाला आपण असेच धावतपळत भेटायला गेलात का नाही?
७ ) शेवटचा मुद्दा: कोरोना काळामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल फक्त भारतात नाही तर जगभरात घेतली गेली. आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि खुद्द पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा श्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना कामगिरीचे कौतुक केले. “धारावी पॅटर्न” तर जगभर गाजला. या उलट कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये मात्र गंगा नदीवर प्रेते तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. असा हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आपण काही सुतोवाच करणार आहात का?…असो, आपल्या मनात नसला तरी बहीण म्हणून माझ्या मनात कायमच स्नेहभाव आहे वृद्धिगंत व्हावा.
आपली बहीण
सुषमा अंधारे
Politics Kharghar Incidence Sudhma andhare Letter to Raj Thackeray