मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही महिन्यांपासून कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीला काही दिवस लोटत नाही तोच पुन्हा एकदा यांच्यात जुंपल्याची माहिती आहे. या प्रकाराने कल्याणमधील वाद संपण्याची चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे.
कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात भाजपचे चिन्ह भिंतीवर रंगवत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध करत बेदम मारहाण केली. या घटनेनंतर भाजपनेदेखील आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी आपल्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात शिवसेना शिंदे गट व भाजपच्या नेत्यांकडून युतीत अलबेल असल्याचे सांगत असले तरी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गट व भाजपामध्ये कुरबुरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजपच्या पक्ष चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध करत तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
पोलिसांत देणार तक्रार
शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे. यावेळी भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला. भाजप शहर अध्यक्षसह कार्यकर्ते कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेत. घडल्या प्रकाराबाबत कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
Politics Kalyan Bjp Shivsena Shinde Faction Members Beaten
Mumbai Corporator Supporters