कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर आता दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शाब्दीक युद्ध सुरू झाले आहे. यात आता हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाडांची भर पडली आहे. दोघांनीही एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यामुळे संभ्रमाच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार सभा पार पडली, या सभेला खासदार शरद पवारांनी संबोधित केले. या सभेतून शरद पवार यांनी अजित पवार गटावर थेट निशाणा साधला. तर, सभेत बोलत आमदार जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर टीका करताना त्यांना गद्दार असे संबोधले. तसेच, शरद पवारांना वस्ताद म्हणत हसन मुश्रीफांचे नाव न घेता त्यांना उस्ताद असे संबोधले. त्यावरुन, आव्हाड आणि मुश्रीफ यांच्यात चांगलाच जुंपली आहे. विशेष म्हणजे ही शाब्दीक चकमक पायतान अन् चप्पलपर्यंत येऊन पोहोचलीय.
कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. तसेच, काहींच्या रक्तातच गद्दारी असते असा घणाघातही आव्हाड यांनी नाव न घेता अजित पवार गटावर केला होता. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायतान प्रसिद्ध आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोलाही आव्हाडांनी लगावला होता. या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी आव्हाडांवर पलटवार केला.
मुश्रीफांच्या टीकेला ट्वीटने उत्तर
जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचे काम केले. अजित पवार आणि आमच्याविषयी त्यांनी असे बोलायला नको. आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात त्यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की त्यांना कळेल, अशा जशास तसा टोला मुश्रीफ यांनी लगावला होता. त्यानंतर पुन्हा ट्विट करुन आव्हाड यांनी हसन मुश्रीफ अस्वस्थ झाल्याचं म्हटले आहे.
Politics Jitendra Awhad NCP Hasan Mushrif Conflict
Kolhapur Critics