जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) देशभरातील अनेक लोकसभेच्या जागांवर भाजपाने उमेदवार बदलाची तयारी सुरू केली आहे याचा स्पष्ट अर्थ आहे. भाजपाच्या जागा पराभूत करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार असून महाराष्ट्रच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत चित्र बदललेले दिसेल व आमच्या पक्षाला यश मिळेल, असा आशावाद राष्ट्रवादीचे नेते खा. पवार यांनी येथे व्यक्त केला. एक देश, एक निवडणुकीचा मुद्दा हा देशवासीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी असल्याचा दावा शरद पवार यांनी येथे केला.
विविध प्रश्नांवर केले भाष्य
राष्ट्रवादीतील फुटीनंतर खासदार शरद पवार प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांची दुपारी दीड वाजता सागरपार्कवरील विशाल मैदानात सभा होत आहे. तत्पूर्वी खासदार पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी पाणीटंचाई, आरक्षण व समान नागरी कायदा, राज्यातील राजकीय चित्र यावर भाष्य केले. अजिंठा रेस्ट हाऊसवर झालेल्या पत्रकार परीषदेत आमदार एकनाथराव खडसे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, अॅड.रवींद्र भैय्या पाटील आदींची उपस्थिती होती.
जळगावात जल्लोषात स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे जळगावात आगमन झाले असून शहरातील सागर पार्कवर सोमवारी दुपारी दीड वाजता त्यांची सभा होत आहे. आज सकाळी १०.४५ वाजता शरद पवारांचे शहरात आगमन झाल्यानंतर शहरातील अजिंठा चौफुलीवर शरद पवार यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शरद पवारांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथका सज्ज होते तर जेसीबीवरुन शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी एक मोठ्या क्रेनवर भव्य हार देखील होता.
सहा क्विंटलचा हार
खासदार शरद पवारांचे मंबईहून सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळावर आगमन झाले. तेथून ते शहरात येण्यासाठी निघाल्यानंतर जागोजागी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, अजिंठा चौफुलीवर त्यांचे भव्य व जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शहरात शरद पवार यांच्या आगमन होताच तब्बल पाच जेसीबीच्या साह्याने भव्य अशी पुष्पृष्टी तसेच तब्बल सहा क्विंटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते. त्यानंतर ते त्यांनी मेहरूण येथे महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट दिली. मेहरुणमध्येही त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात फुटीनंतर पहिलीच सभा
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होणार आहे. या सभेकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीकडून राज्यातील आतापर्यंतच्या सर्व सभांपेक्षा जळगावची सभा सर्वात मोठी ठरावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
Sharad Pawar’s rousing welcome to Jalgaon drew attention to this issue
Politics Jalgaon NCP Sharad Pawar India Name change