जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हे आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची दुर्घटना टाळता आली असती, अशी टीका मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. अमित ठाकरे हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी पहिल्यांदाच शिंदे सरकारवर टीका केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, राजसाहेब ठाकरे आधीच इर्शाळवाडी घटनेबाबत सांगितले की सरकारने लक्ष दिले पाहिजे. पण सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसतं तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती. इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच सरकारने लक्ष द्यायला हवं होते, इर्शाळवाडीची दुर्घटना दुर्देवी आहे.
इर्शाळवाडी हे गाव दरडग्रस्तांच्या यादीत नव्हते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत तेच सांगितले. असे असतांना ही दुर्घटना घडली. इर्शाळवाडीत दरड कोसळून बुधवारी रात्री दुर्घटना घडली. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ३४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. आजही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.