जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावर रोहित पवारांना विचारणा केली असता गोलमाल उत्तर देत ज्युनिअर पवारांनी बोलणे टाळले.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून स्वत:चा वेगळा गट घेऊन अजित पवार सत्तेत सामील झाले. तरीदेखील अद्याप राष्ट्रवादी तांत्रिकदृष्ट्या पक्ष म्हणून एक आहे. तसे उत्तरदेखील निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन पेटले आहे. त्यात अजित पवारांनी सत्तात्याग करावा, अशा घोषणा देण्यात आल्या. मुंबई राष्ट्रवादीतील बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सकल मराठा समाजाच्यावतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, बारामतीमधील या मोर्चात अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांना जळगावमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, रोहित पवार यांनी या प्रश्नावर उत्तर देणे गोलगोल टाळले. बारामतीमध्ये एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत सकल मराठा समाजाच्यावतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.
यावेळी, सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा अशा घोषणांनी बारामतीचा मोर्चा दणाणून गेला होता. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे का? मराठा नेते आणि बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटते. मात्र, या प्रश्नावर त्यांनी शाब्दिकरित्या गोलगोल फिरवत उत्तर देणे टाळले.
तिथल्या घोषणा व्यक्तिगत
तिथल्या घोषणा व्यक्तीगत होत्या, तिथले लोकप्रतिनिधी अजित दादा आहेत. ही त्यांच्या मतदारसंघातील भूमिका आहे, त्यामुळे यावर मी काही बोलू शकणार नाही. जे काही बोलायचंय ते दादा बोलतील, असे म्हणत रोहित पवार यांनी उत्तर देणं टाळलं. त्यानंतर, पत्रकाराने पुन्हा हाच प्रश्न विचारला. पण, त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेधे म्हणत, ही सरकारची हेकेशाही असल्याचे सांगत उत्तर देणं टाळलं. तसेच, राजकीय दृष्टीकोनातून मी यावर काही म्हणणार नाही, असे गोलगोल फिरत रोहित पवारांनी उत्तर दिले.
Politics Jalgaon Maratha Reservation Ajit Pawar NCP Rohit Pawar