अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकारणात पक्ष सोडणे आणि पक्षात परत येणे ही अत्यंत कॉमन बाब आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि ते विजयी झाले. त्यानंतर त्यांना काँग्रेसमध्ये परत येण्याचे आवाहनही करण्यात आले. पण त्याला उत्तर म्हणून सत्यजित तांबे यांनी केलेले ट्विट त्यांची झेप कोणत्या दिशेने आहे, याची चर्चा घडविणारे ठरत आहे.
नाशिकच्या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यासाठी त्यांना सुधीर तांबे यांना एबी फॉर्मही दिला होता. पण ऐनवेळी सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे निवडणुकीची सगळी राजकीय समीकरणे बदलली. दरम्यान, भाजपने उमेदवार न देता तांबेंना छुपा पाठिंबा दिल्याचा संशय घेतला गेला. नंतर सत्यजित तांबे यांनी निवडणुकीत बाजी मारली.
काँग्रेसवर नाराज असलेले बाळासाहेब थोरात यांनी एका कार्यक्रमात पक्षात परत येण्याचे आवाहन सत्यजित तांबेंना केले. ‘तांबेंची टीम काँग्रेसमध्येच आहे. त्यांना करमणार नाही. त्यामुळे पक्षात परत येण्याचा विचार करावा’, असे आवाहन थोरात यांनी केले होते. त्यावर सत्यजित तांबे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज त्यांनी एक ट्विट करून या आवाहनालाच उत्तर दिले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. तांबे यांनी आपला काँग्रेमध्ये परतीचा कुठलीही विचार नसल्याचेच स्पष्ट केले आहे. या उत्तरासाठी तांबे यांनी एका वितेचा आधार घेतला आहे.
काय आहे ट्विटमध्ये?
सत्यजित तांबे यांनी ट्विटसाठी मराठी कवितेच्या ओळींचा आधार घेतला आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी…घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी’ अशा ओळी आहेत.
https://twitter.com/satyajeettambe/status/1625366536411303936?s=20&t=uU7pcdDcAcEcg6G12VPb8g
कोणत्या पक्षात जाणार?
तांबेंनी आपल्या ट्विटमधून काँग्रेसमध्ये परतणार नाही, हे तर स्पष्ट कले, पण भविष्याची दिशा काय असेल याची चर्चा होऊ लागली आहे. भाजपने निवडणुकीत सत्यजित तांबेंना छुपा पाठिंबा दिला होता, असे बोलले जात होते. त्यामुळे तांबे काँग्रेसचा मार्ग बंद करून भाजपमध्ये प्रवेश करतात की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.
Politics Independent MLC Satyajit Tambe Says