मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जुन्या संदर्भांची उजळणी करण्यास भाग पाडले आहे. पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका असताना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. पण यापूर्वी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात दिग्गजांसोबत हा प्रसंग घडलेला आहे.
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे घोषित केल्यानंतर कार्यकर्ते आणि नेते दुःखी झाले. कुणी रडायला लागले तर कुणाच्या डोळ्यात अश्रु तरळले. पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी जिद्द करण्यात आली. राजीनाम्याला मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर शरद पवार यांनी विचार करण्यासाठी दोन दिवस मागितले आहेत. त्यानंतर ते भूमिका स्पष्ट करणार आहेत.
विशेष म्हणजे शरद पवार यांच्या मनाचा थांग लागणे अशक्य आहे.त्यांचे राजकीय विधान प्रत्येकवेळी काहीतरी सूचित करणारेच असते. त्यामुळे आता त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा करणेही कुठलातरी राजकीय संकेत असल्याचा अंदाज लावला जात आहे. पण ही घटना राज्यात किंवा देशात पहिल्यांदा घटलेली नाही. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. १९७८ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पराभव झाला तर राजीनामा देईल, अशी घोषणा केली होती.
प्रत्यक्ष निवडणुकीत ४० पैकी २२ जागा शिवसेनेला जिंकता आल्या. त्यामुळे आपल्या शब्दाला जागत बाळासाहेबांनी राजीनामा दिला होता. पण त्यांच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी राडा घातला. एकाने तर स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले होते. त्यामुळे बाळासाहेबांनी राजीनामा मागे घेतला होता. यानंतर एकदा सामनातील अग्रलेखाला ‘जय महाराष्ट्र’ असे शिर्षक देऊन बाळासाहेबांनी राजीनाम्याचे संकेत दिले होते. त्यावरून शिवसेना भवन व मातोश्रीबाहेर मोठी गर्दी झाली. कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यावर त्यांनी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. १९८९ सालची ही घटना आहे.
सोनियांच्या अंतर्मनाचा आवाज
२००४ मध्ये युपीआयचे सरकार स्थापन होत असताना सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उचलून विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे सोनिया गांधी यांनी संसदीय पक्षनेतेपदाचा राजीनामा देत आपण पंतप्रधान होणार नसल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी १९९९ मध्ये हाच विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून कार्यकारी समितीतील शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांनी विरोध केला. त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण पवार, संगमा आणि अन्वर काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला.
पवार राजीनामा मागे घेतील?
शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असला तरीही कार्यकर्ते आणि नेत्यांच्या प्रेशरमध्ये ते राजीनामा मागे घेतील, असे बोलले जात आहे. १९७८ मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि १९९९ मध्ये सोनिया गांधी यांनी विविध कारणांनी राजीनामा मागे घेतला होता. त्याचीच पुनरावृत्ती शरद पवार यांच्या निमित्ताने होईल, अशी शंकाही व्यक्त होत आहे.
Politics History Sharad Pawar Sonia Gandhi Balasaheb Thackeray