हिंगोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतील पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच हिंगोलीत उध्दव ठाकरे यांनी सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तर आमदार संतोष बांगर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ज्या गद्दाराला आपण नाक समजून पूजा केली, उलट तोच आपल्यालाच डसायला लागला. तुला पुंगी वाजवली तुला दूध पाजलं अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी बांगर यांचा समाचार घेतला. तसेच, त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपमध्ये आता सगळे आयाराम आहेत. अन् कार्यकर्ते केवळ सतरंज्या उचलण्यासाठी आहेत.
हिंगोलीच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेत उध्दव ठाकरे काय बोलतात याची सर्वांना उत्सुकता होती. या सभेत त्यांनी आमदार संतोष बांगर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. शासन आपल्या दारी, थापा मारतो लय भारी अशी खोचक टीकाही केली. सरकार आपल्या दारी म्हणत असून, योजना फक्त कागदावरी असेही ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, माझी सभा जनतेसाठी आहे, गद्दारांसाठी नाही. मी गद्दारावर वेळ घालणार नाही. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे, असे सांगत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. ते म्हणाले की, एनडीएचा अमिबा झालाय, आम्ही इंडिया तुम्ही घमेंडिया झाला आहात, त्यामुळे इंडिया म्हणून आम्ही एकत्र आलो असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये १४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन हे अहमदाबादमधीन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आल्यावरुनही पंतप्रधान मोदी यांना प्रश्न केला. तुमच्या स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना चालतो, हे कुठलं देशप्रेम आहे.