मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांनी विधानपरिषदेतील १२ सदस्यांचा प्रश्न निकाली काढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा मुद्दा रखडलेला होता. त्यावर तीनही पक्षांनी तोडगा काढत १२ जागांचे वाटप करून टाकले आहे.
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त या १२ आमदारांच्या जागांवर कुणाचा नंबर लागेल हे येणारा काळ सांगणार आहे. मात्र, यासाठी तीनही पक्षांनी पुढाकार घेत जागा वाटप निश्चित केले आहे. प्राप्त माहितीनुसार, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळापासून रेंगाळलेला १२ राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांचा विषय आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी आमदारांचा फॉर्म्युला ठरला आहे. शिंदे गटाने म्हटल्याप्रमाणे आता भाकरीत वाटेकरी निर्माण झाले आहेत. परंतू, ते भाजपाच्या नाही तर शिंदे गटाच्याच वाट्याला आले आहेत, असे या फॉर्म्युल्यावरून दिसत आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेली १२ आमदारांची यादी अडविली होती. यावरून राजकारण सुरु होते. या यादीतील एकनाथ खडसे हे विधानपरिषद निवडणुकीत निवडूनही आले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने पुढे सत्तांतर झाले आणि ही यादीच मागे पडली होती.
कुणाची लागणार वर्णी
आता शिंदे आणि भाजपाच्या सरकारमध्ये तिसरा पक्ष आला आहे. यामुळे या १२ जागा आता तीन पक्षांत विभागल्या जाणार आहेत. यापैकी भाजपाला ६, शिवसेनेला ३ व अजित पवार गटाला ३ जागा दिल्या जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. एबीपी माझाने याचे वृत्त दिले आहे. आता या यादीत कोणाकोणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.