नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्ष निवडणूक मोडवर आला आहे. संघटनात्मक बदल सुरू झाले असून एकापाठोपाठ एक पक्षातील मोठ्या नेत्यांना झटका बसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने सुरू केलेल्या महासंपर्क अभियानातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाजूला करत प्रवीण दरेकरांवर जबाबदारी दिली. त्यानंतर आता गिरीश महाजनांना बाजूला करत नाशिकची जबाबदारी नवीन नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.
भाजपच्या दृष्टीने गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्राचे प्रबळ नेते आहेत. उत्तर महाराष्ट्रातही निवडणूक आणि गिरीश महाजन हे समीकरण सर्वश्रुत आहे. प्रभारीपदाची नेमणूक हा भाजप पक्षाचा संघटनात्मक रचनेचा एक भाग आहे. उत्तर महाराष्ट्र निवडणुकांसह विविध गोष्टीचे अधिकार महाजन यांच्याकडेच असून ते पुढेही राहणार आहेत. महाजन हे उत्तर महाराष्ट्राचे संकट मोचक असून त्यांच्या अधिकारात कुठेही फरक झालेला नाही, असे सांगण्यात येत असले तरी महाजन यांना नाशिकपासून पक्षाने दूर ठेवल्याने राज्यात धक्कातंत्राची चर्चा जोरात सुरू आहे.
भाजपने आता पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी दिली आहे. तर राजेंद्र गावित यांच्याकडे नाशिक शहर, तसेच उत्तर नाशिक आणि दक्षिण नाशिकची जबाबदारी दिली आहे. दोघेही नंदुरबारचे आहेत. विजय चौधरी यांनी यापूर्वी नाशिकचे संघटन बघितले असले, तरी राजेंद्र गावित यांच्यावर प्रथमच जबाबदारी देण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे राजेंद्र हे बंधू आहेत.
पालकमंत्रीपदही
राज्यात महाविकास आघाडीचा तख्ता पालट झाल्यांनतर राज्याचे नवीन मंत्रिमंडळ तयार झाले. त्यावेळी गिरीश महाजन यांच्याकडे सूत्रे येण्याची शक्यता होती. तसेच मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांची नियुक्ती करण्यात येत होती. अशावेळी नाशिकवर सगळ्यांचे लक्ष लागून होते. मात्र पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांना मिळेल असे वाटत असताना पक्षाने धक्कातंत्राचा वापर केल्याने नाशिकचे पालकमंत्रिपद शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्याकडे गेले.
Politics Girish Mahajan BJP Responsibility