मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. याचा सध्या प्रत्यय येत आहे. गेल्या तीन-चार महिन्यापासून महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एका बाजूला घट्टपणे पाय राहून उभे आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांनी सत्ता स्थापन करून आपले वर्चस्व दाखविले आहे. त्यामुळे दोन्ही बाजू मधून विस्तव जात नाही, असे म्हटले जाते. दोन्हीकडून वेगवेगळ्या कारणांवरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशाप्रकारे हा संघर्ष पेटला असताना आता तीन वेगवेगळ्या पक्षांचे नेते जेवणासाठी एकाच टेबलावर बसणार आहेत.
याचे कारण म्हणजे क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होय. त्यामुळे या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेहमी विविध कारणांनी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे विविध राजकीय पक्षांचे नेते, मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक गुरुवार, दि. २० ऑक्टोबर रोजी होत आहे. यानिमित्त वानखेडे स्टेडियमवर स्नेहभोजनासाठी सांयकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र येत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार आशीष शेलार तसेच, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच हे सर्वजण एका व्यासपीठावर येत असल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच या कार्यक्रमाचा राजकारणाशी काही संबंध नाही, असे आधीच स्पष्ट करण्यात आलेले आहे. तरी हे सर्व नेते एकत्र आल्यावर काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागणे साहजिक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे इतर नेत्यांबरोबर वानखेडे मैदानावरील गरवारे क्लबमध्ये एकत्र येणार आहेत, अशी माहिती भाजपाच्या सुत्रांनी दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक नावाजलेली संस्था असून फडणवीस आणि पवारांचा डिनर प्लॅन हा एमसीएच्या कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आला आहे.
निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशीष शेलार यांनी संयुक्त पॅनल उभे केले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर तसेच, फडणवीस यांच्या खास मर्जीतील अमोल काळे व बहुजन विकास आघाडीच्या अजिंक्य नाईक यांचा समावेश आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटाने एकत्र येत पॅनल उभं केलं आहे. काही दिवसांपूर्वीच एमसीएच्या मतदारांच्या बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेते आणि आमदार एकाच ठिकाणी दिसून आले होते.
यावेळी क्रिकेटसाठी आम्ही एकत्र आलो असून यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे शिंदे गटाचे आमदार आणि एमसीएचे मतदार असणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते. संघटनेच्या अध्यक्षपदासाठी काळे आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात निवडणूक होणार आहे. अनेक राजकीय नेते काळे यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
Politics Fadanvis Pawar Shinde on Same Dias
Maharashtra