नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘भाजपसोबत समझोता केला असता तर मला अटक झाली नसती, पण सरकार कोसळले असते’ असे खळबळजनक वक्तव्य राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केंद्र सरकारद्वारे ईडीसारच्या सरकारी संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सातत्याने लावण्यात येत आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलाविले होते. या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री देशमुख यांनी भाजपवर आरोप केले आहेत. ‘२ वर्षापूर्वी मी भाजपासोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली. पण २ वर्षापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार पडले असते. मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते.’
जयंत पाटलांवर दबाव
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्यावर भाजपाकडून दबाव होता. भाजपाचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून जयंत पाटील यांच्यावर ईडी कारवाई झाली असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तर राऊतांचा हा दावा भाजपाने फेटाळला. याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी ‘२ वर्षापूर्वी मलाही भाजपाने प्रस्ताव पाठवला होता असे,’ म्हटले आहे.
राष्ट्रवादी कुल्याही जातीधर्माचा पक्ष नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक आहे. तो कुठल्याही जाती वा धर्माचा पक्ष नाही, असे सांगत देशमुख यांनी नागपुरातील दोनदिवसीय ओबीसी सेलच्या शिबिराला पक्षातील सर्व दिग्गज नेते मार्गदर्शन करतील, अशी माहिती दिली.
Politics Ex Home Minister Anil Deshmukh Statement