मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कसबा पोटनिवडणूक ही नियमित निवडणुकीपेक्षाही जोमाने लढविण्यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. सर्व पक्षांनी त्यांचे स्टार प्रचारक येथे लावलेत. मुख्य म्हणजे भाजपचा बालेकिल्ला म्हणविला जाणारा हा मतदासंघ त्यांना मनसे, शिंदे गटाच्या सहकार्यानंतरही राखता आला नाही. परिणामत: भाजपने स्वीकारलेल्या नव्या राजकीय समीकरणांबाबत पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
एकीकडे भाजप महाविजय २०२४ साठी तयारी करत असताना दुसरीकडे त्यांच्यावर कसब्यातील पराभवामुळे आत्मचिंतनाची गरज आली आहे. दोन दशकांहून जुना मित्र असलेल्या शिवसेनेला बाजूला सारत भाजपने राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने सरकार निर्माण केले. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी सलगी वाढवित त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ उठविण्याचा प्रयत्न केला. कसबा निवडणुकीत मनसेने भाजपला संपूर्ण पाठींबा दिला. तर शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांनी भाजपसाठी जोरकसपणे प्रचार केला. पण, इतके होऊनही भाजपला येथे धुळ चाखावी लागली आहे. २८ वर्षापासून ताब्यात असलेला हा मतदारसंघ गमवावा लागला. त्यामुळे मनसे आणि शिंदे गटासोबत २०२४बाबत विचार करावा का, यासंदर्भात पक्षात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
सत्ता असूनही पराभव
साधारणपणे राज्यात सत्ता असलेल्या पक्षाला अशा प्रकारच्या पोटनिवडणुका जिंकणे सहजशक्य होते. त्यांना त्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. पण, भाजपला सत्ता असुनही त्याचा फायदा झाला नाही. यामागे ब्राह्मण उमेदवार न देण्याची भाजपची भूमिका नडल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी नाकारत इतर व्यक्तीला दिल्याची नाराजी सुरुवातीपासून व्यक्त होत होती. त्याचेच परिणाम कसब्यातील पराभवाच्या रुपात दिसून आले आहेत.
Politics Eknath Shinde MNS BJP Benefits Kasba Election