नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकना शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतून बोलवणे आल्याने दोघेही नेते येथे दाखल झाले आहेत. या दौऱ्यातते कुणाकुणाची भेट घेणार आणि काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत अंतिम निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्याला येत्या ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. भक्कम बहुमताचा दावा करणारे शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तार करत नसल्याने जनतेला न्याय मिळत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. केवळ शासन आपल्या दारी असा उपक्रम घेऊन आणि तशा घोषणा करुन काहीच साध्य होत नसल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. आणि आता याच पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत.
राज्य सरकारला १ वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार व्हावा यासाठी शिंदे गट आग्रही आहे. मात्र, भाजप हायकमांडची मंजुरी त्यासाठी आवश्यक आहे. दिल्लीतून अद्याप ग्रीम सिग्नल मिळालेला नाही. याचदरम्यान, शिंदे गटातील ५ मंत्र्यांना हटविण्याची मागणी खुद्द भाजप नेत्यांनीच हायकमांडकडे केली आहे. त्यामुळे सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. म्हणूनच शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हे दोन्ही नेते गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते.