विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याच्या राजकारणात अनेक गतिमान घडामोडी घडत असून आज पुन्हा एका घटनेने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट संपन्न झाली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने पक्ष अध्यक्षांची भेट घेणे ही तशी नवी बाब नाही. मात्र, गेल्या काही दिवसात घटलेल्या गाठीभेटींनतर शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकते आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच खडसे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी खडसे यांनी पवार यांची भेट घेतली आहे. दोन दिवसापूर्वीच फडणवीस यांनीही पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. तसेच, शिवसेना नेते उदय सामंत यांनीही पवार यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली आहे. या सर्व घडामोडी पाहता राज्याच्या राजकारणात नक्की काय चालले आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
पवार-खडसे भेटीबाबत अद्याप अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. गेल्याच वर्षी खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.