मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील विविध विकासकामे तसेच प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वॉररूम तयार केले आहे. त्या माध्यमातून विकासप्रकल्पांवर नजर ठेवण्यात येत असतानाच आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट सुरू केले आहे. दादांच्या या निर्णयाने मुख्यमंत्र्यांच्या वॉररूमला आव्हान देण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले जात आहे.
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांची वॅार रुम आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये या वॅाररुमची स्थापना केली. या वॅाररुमच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग, पुण्यातील रिंग रोड किंवा विमानतळाची काम यासारख्या पन्नासहून अधिक प्रोजेक्टचा आढावा याच वॅाररुममधून मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरेंनी याचे नामांतर करून संकल्प कक्ष सुरू केला. आता सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा वॉररुम हे नाव कायम ठेवण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याच वॉर रूममधून प्रकल्पांच्याआढावाच्या काही बैठकाही घेतल्या. मात्र, याच वॅाररुमवरुन सरकारमधये कोल्डवॅार सुरू झालेय का, असा प्रश्न आता विरोधक विचारु लागले आहेत.
नव्या युनिटची गरज का?
मंत्रालयात मुख्यमंत्री वॅाररुम असताना सरकारमध्ये नव्याने दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटची स्थापना करून गुरुवारी या संदर्भातली बैठक घेतली. या बैठकीला मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एवढेच नाही तर मुख्यमंत्री वॅार रुमचे सर्वेसर्वा राधेश्याम मोपलावरही या बैठकीला उपस्थित होते आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा अजित पवारांनी घेतला. हा एकच आढावा नाही तर दर पंधरा दिवसांनी या प्रकल्पाबाबत ही बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण होतेय का तसेच या नव्या युनिटची गरज का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
वडेट्टीवारांचा दादांवर वार
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर घणाघाती टीका करताना अजित पवारांच्या नव्या युनिटवर टीका केली आहे. अधिकार नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार वॉररूमध्ये बैठक घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या वॉररूमवरून कोल्ड वॉर सुरू झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.