सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘मी पुन्हा येईन’ची गर्जना केली आहे. ते सध्या सत्तेत असतानाही असे म्हणत असल्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला. पण फडणविसांनी आता असे म्हणण्याचे नेमके कारण काय असावे, याबद्दल शरद पवारांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे दहा महिन्यांपूर्वी ते पुन्हा सत्तेत आले. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांना पुढे केले. त्यामुळे त्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेला काही अर्थ उरला नाही, असे बोलले गेले. पण आता खरे तर न्यायालयाचा निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने लागला तर सत्ता टिकविण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. आणि त्यात पुन्हा शिंदेंच्या ऐवजी दुसरा मुख्यमंत्री बसवावा लागणार आहे.
अश्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही गर्जना देण्याचे कारण काय असावे, याची बरीच चर्चा रंगलेली आहे. यामागचे कारण शरद पवार यांना विचारले असता त्यांनी खास आपल्या शैलीत उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. ‘आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. हा निकाल काय असेल याबाबत कुणालाच माहिती नाही. मला तर मुळीच माहिती नाही. पण त्यांना माहिती असेल म्हणूनच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणत असावे,’ या शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
मुळात ठाकरे गटाच्या बाजुने निकाल लागल्यास सरकार धोक्यात येईल, असे बोलले जात असताना शरद पवार यांनी ‘भाजपकडे बहुमत असल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही’, असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर त्यांनी फडणविसांच्या बाबतीत केलेली ही मिष्किली बरेच काही सूचविणारे आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
एकनाथ शिंदेंचे पद धोक्यात
देवेंद्र फडणवीस यांनी आता पुन्हा एकदा ‘मी पुन्हा येईन’ची गर्जना करणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोकादायक असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला होता. देवेंद्र यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवले आणि आता तेच स्वतः मी पुन्हा येईन असे म्हणत असतील तर शिंदेंच्या जागी येणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Politics Devendra Fadnavis Supreme Court Order