विशेष प्रतिनिधी, मुंबई
अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेसोबत फाटल्यामुळे सत्ता गमावून बसलेल्या भाजपला अद्याप सत्तेत येण्याची आशा आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यात अडीच वर्षे पूर्णही केली आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांची विधाने आणि गुप्त राजकीय बैठकांनी अस्वस्थता निर्माण केली आहे. अलीकडेच शिवसेनेसोबत आमचे शत्रुत्व नाही, असे वक्तव्य करून फडणवीसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पेरली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘शिवसेनेसोबत आमचा वैचारिक मतभेद असला तरीही शत्रुत्व नाही. कुठलाही निर्णय परिस्थिती बघूनच घेतला जाईल.’ मुळात शिवसेनेसोबत भाजपचे मैत्र तर आहेच, पण वैचारिक मतभेद असण्याचे काहीच कारण नाही. कारण सेना आणि भाजप हिंदुत्व या एकाच धाग्यात बांधले गेले आहेत. केवळ खुर्चीमुळे ताटातूट झाली. पण आता फडणवीसांना काय संकेत द्यायचे आहेत, ते त्यांनाच ठाऊक.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. त्याचवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या बैठकीबाबत आपल्याला काहीच ठाऊक नसल्याचे त्यांनी सांगितले. पण दोन पक्षांमधील नेत्यांच्या भेटी होत असतील तर त्यात गैर काहीच नाही. शिवसेना आमचा जुना मित्रपक्ष आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेमुळे त्यांच्याशी आमचे मतभेद झाले, पण शत्रुत्व मुळीच नाही, असेही फडणवीस म्हणाले. शिवसेनेचे ज्या पक्षांशी वैचारिक मतभेद होते, त्यांच्यासोबत त्यांनी सरकार स्थापन केले. राजकारणात जर–तरच्या प्रश्नांना अर्थ नसतो. वेळ आल्यावर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो, असे सांगून सेना–भाजप युतीची शक्यताही त्यांनी नाकारली नाही.
कुणासोबतही चर्चा नाही
शिवसेनेसह कुठल्याही राजकीय पक्षाशी आमची चर्चा सुरू नाही. भाजप एक सक्षम विरोधीपक्ष आहे, असेही देवेंद्र यांनी स्पष्ट केले. एकीकडे काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या गोष्टी करीत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी १० मिनीटे स्वतंत्र चर्चा केली. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.