नवी दिल्ली – काँग्रेसशासित राज्यांमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची बाब आता नवी राहिलेली नाही. पंजाबनंतर आता छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि आरोग्यमंत्री टी. एस. देव काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटले आहेत. आता छत्तीसगढमधील १३ आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे. हे आमदार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय आहेत. आमदार बृहस्पत सिंह या आमदारांचे नेतृत्व करत आहेत.
छत्तीसगढमध्ये काँग्रेसच्या ६० आमदारांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पाठिंबा दिला आहे, असे आमदार बृहस्पत सिंह यांनी सांगितले. आमदारांच्या निर्णयाबाबत पक्षश्रेष्ठींना अवगत करून देण्यात आले आहे. कोण्या एका व्यक्तीला खूश करण्यासाठी ७० आमदारांचे भवितव्य टांगले जावू शकत नाही, अशी टीका त्यांनी देव यांचे नाव न घेता केली. काँग्रेस पक्षश्रेष्ठी देशातील इतर राज्यांमध्येही बदल करत आहे. त्यामध्ये छत्तीसगढ मॉडेल स्वीकारण्याची अट ठेवली जात आहे. त्यामुळे छत्तीसगढमध्ये कोणताच बदल होण्याची शक्यता नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव म्हणाले, की ही लोकशाही आहे, काँग्रेस एक खुला मंच आहे. वरिष्ठ नेते नागरिकांना भेटण्याची वेळ देतात. या आमदारांना भेटीची वेळ दिली असेल तर भेट होईल. छत्तीसगढमध्ये राजकारणाबाबत काय चर्चा होती हे सर्वांना ठाऊक आहे. यामध्ये लपविण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. बदल होण्याची चर्चा होती, तो होईल की नाही ही नंतरची गोष्ट आहे. परंतु ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. गेल्या वेळी आमदार दिल्लीत गेले होते. त्यावर चर्चा झाली होती. आमदार आपले म्हणणे मांडण्यासाठी गेले असतील असे असू शकते. दिल्लीत काय सुरू आहे हे पाण्यासाठी ते गेले असतील, असे सिंहदेव म्हणाले.
छत्तीसगढ काँग्रेसमध्ये दोन गट झाले आहेत. पक्षश्रेष्ठींनी दिलेले अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे वचन पाळावे यासाठी टी. एस. सिंहदेव यांच्या गटाकडून दबाव टाकला जात आहे. मंत्रिपदावरून राजीनामा देण्याचा इशाराही त्यांच्या समर्थक आमदारांनी दिला आहे. दुसरीकडे भूपेश बघेल आपली खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. गेल्या महिन्यात काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती.