नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लग्नाचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. त्यांचे लग्न कधी होणार, याबाबत अनेक जण विचारणा करत असतात. काही जण त्यांना आता विलंब करू नका, लग्न उरकवून टाका असा सल्लादेखील देतात. अशातच आता एका शेतकरी महिलेने थेट राहुल यांच्या आई तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना राहुलच्या लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर सोनियांनीदेखील हजरजबाबीपणा दाखवित ‘तुम्ही मुलगी शोधा’ असे उत्तर दिले.
राहुल यांच्या लग्नाबाबत काही दिवसांपूर्वीच राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनीदेखील वक्तव्य केले होते. देशभरातील विरोधी पक्षांच्या बैठकीत लालू यादव यांनी राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय छेडला होता. आता लग्न करून टाका. तुमची आई म्हणते तुम्ही त्यांचे ऐकत नाही. आईचा सल्ला ऐका आणि लग्न करून टाका, असे लालू यादव म्हणाले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनीदेखील लवकरच करणार, असे म्हणून वेळ मारून नेली होती. तेव्हापासून पुन्हा एकदा राहुल यांच्या लग्नाचा मुद्दा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी हरियाणा एका शेतात भात लावणी करणाऱ्या शेतकरी महिलांना घरी जेवणाचे आमंत्रण दिले. त्यावेळी शेतकरी महिलेने सोनिया गांधींना राहुल गांधी यांचे लग्न लावून देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी शेतकरी महिलेला उत्तर देत,‘तुम्हीच मुलगी शोधा’ असे म्हटले. त्यांच्या त्या उत्तराने एकच हशा पिकला.
राहुल यांचे ट्वीट
सोनिया गांधी आणि शेतकरी महिलांमधील या भेटीचे एक ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी महिलांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या राहुल गांधी यांनी ट्विटरच्या कॅफ्शनमध्ये म्हटले आहे की,‘आई, प्रियंका आणि माझ्या खूप महत्त्वाचा क्षण होता. सोनीपतच्या शेतकरी महिलांनी घरी दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच त्यांनी खूप गप्पा मारल्या. तसेच त्यांनी गांधी कुटुंबाला भेटवस्तूदेखील आणल्या. या महिलांनी घी, गोड लस्सी, लोणचे घेऊन आल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.